मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन गटातील संघर्षाला सुरुवात झाली आहे. कालच्या बंडानंतर आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. (MP Sunil Tatkare appoint as state president of NCP Maharashtra)
पटेल म्हणाले, अजित पवारांकडून संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. यानुसार आता जयंत पाटलांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटविण्यात आले असून सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत पाटील यांची तेव्हा तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली होती. आता मी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष या नात्याने सुनिल तटकरे यांची नियुक्ती करत आहेत. आता जयंत पाटील यांनी त्यांच्या पदाची सुत्रे तटकरे यांच्याकडे सुपुर्द करावी. आता इथून पुढे पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सुनिल तटकरे हे नियुक्त्या करतील.
याशिवाय अजित पवार यांची आमदारांनी पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून निवड केली आहे. अजितदादा पक्षाच्या वतीने अधिकृतपणे पक्षाचा नेता म्हणून काम करतील. त्याबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना कळविण्यात आले आहे. यासोबतच प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती केली आहे, अशीही माहिती पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना पटेल यांंनी अपात्रता कारवाईच्या नोटिसीबद्दलही भाष्य केले. आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांना असतो, कोणताही पक्ष किंवा निवडणूक आयोग करु शकत नाहीत, असे स्पष्ट केले.
यावेळी सुनिल तटकरे यांनी विविध संघटनात्मक नियुक्त्या केल्या. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केली. तर युवक काँग्रेस अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केली. यावेळी प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे आणि सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, तटकरे यांनी दिली.