MPSC Paper Leak Complaint Deadline Extended: राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्येही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फुटल्याचे आरोप झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यासाठी पुण्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला. आता या आयोगाने विद्यार्थ्यांना तक्रारी आणि निवेदने सादर करण्यासाठी आणखी मुदत दिली आहे.
या चौकशी आयोगात निवृत्त न्यायाधीशांसह सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचाही समावेश आहे. एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फुटल्याच्या कथित घटनांची चौकशी आयोगाकडून केली जात आहे. या प्रकरणांबाबत माहिती असलेल्या व्यक्ती, परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.
यापूर्वी संबंधितांना 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत विहित प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यात निवेदन सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेकांना कागदपत्रे तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी ही मुदत आता 23 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
तक्रार कशी आणि कुठे दाखल करायची?
एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकारांबाबत तक्रार करायची असल्यास संबंधितांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती (झेरॉक्सवर स्वतःची सही केलेली प्रत) जोडाव्या लागतील.
एनव्हिडियाच्या सीईओंच्या कथित प्रेमप्रकरणाने जगभर खळबळ, कंपनीच्या बाजारमूल्याला मोठा फटका
तसेच प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि संबंधित कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या अधिकृत ई-मेलवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रार पाठवण्यासाठी ई-मेल
complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in
तक्रारींसाठी संपर्क क्रमांक
तक्रार दाखल करताना काही अडचण आल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास 022-20867677 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
विशेष म्हणजे, 23 नोव्हेंबर 2026 ही निवेदने सादर करण्याची अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर प्राप्त होणारी प्रतिज्ञापत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षांमधील कथित गैरप्रकारांबाबत काही माहिती किंवा पुरावे असलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपली तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
