Mumbai : मराठी भाषा (Marathi Language) जुनी भाषा असून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र ही मागणी अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना विनंती करेल, अशी ग्वाही दिली.
हे वाचा : अभिनेता सुबोध भावेकडून मराठी राजभाषा दिनाच्या खास शुभेच्छा
ते पुढे म्हणाले, की सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल.
दरम्यान, मागील 9 वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मागण्या होत आहेत.कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने सन 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले.
मराठी भाषा दिन : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि तो कसा मिळतो ?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काही निकष आहेत. त्यामध्ये भाषेचा नोंदविलेला इतिहास हा अती प्राचीन म्हणजे 1500-2000 वर्षे जुना पाहिजे. प्राचीन साहित्य हवे, जे त्या भाषिकांना मौल्यवान साहित्य वाटते. दुसऱ्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी. तसेच अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा वेगळी हवी.
सरकारने आतापर्यंत तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया भाषेला 2014 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे.