मुंबई : स्पर्धा परीक्षांचा ताण आणि त्यातील आव्हाने हा सध्या महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. प्रामाणिक कष्टानंतरही अपयश जेव्हा समोर उभे राहते तेव्हा निराशा येते. अशा लोकांचे मनोधैर्य उंचावण्याची आणि अमूल्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यासाठी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी ‘मुसंडी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत आणि गोवर्धन दोलताडे लिखित व निर्मित ‘मुसंडी’ हा चित्रपट ५ मे २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मुसंडी’ चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी आजच्या युवकांना दिशा देण्याचं काम ‘मुसंडी’ चित्रपट करेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला.
रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी), सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत.