NEET फेरपरीक्षेत NTAचा अजब घोळ; नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबूधाबीचे परीक्षा केंद्र, रोहित पवारांचा संताप

21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी जारी करण्यात आलेल्या प्रवेशपत्रात त्याचे परीक्षा केंद्र थेट अबूधाबी दाखवण्यात आले.

Untitled Design 23

Untitled Design 23

Nagpur student assigned Abu Dhabi exam centre directly : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून मोठमोठे दावे केले जात असतानाच, फेरपरीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी NTAच्या कारभारातील एक धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. नागपूरमधील एका विद्यार्थ्याला परीक्षेसाठी चक्क संयुक्त अरब अमिरातीतील अबूधाबी येथील परीक्षा केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरच्या विद्यार्थ्याला NEET परीक्षेसाठी थेट अबूधाबीचे परीक्षा केंद्र मिळाले. काय बोलावे हेच कळत नाही. धन्य ती NTA आणि धन्य ते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान. नशीब, इराणमध्ये परीक्षा केंद्र मिळाले नाही, असे उपरोधिक वक्तव्य त्यांनी सोशल मीडियावर केले.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील अब्दुल्लाह या विद्यार्थ्याने NEET परीक्षेसाठी अर्ज भरताना नागपूर आणि वर्धा या शहरांना केंद्रासाठी प्राधान्य दिले होते. यापूर्वी झालेल्या परीक्षेत त्याला नागपूरमध्येच केंद्र मिळाले होते. मात्र, 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी जारी करण्यात आलेल्या प्रवेशपत्रात त्याचे परीक्षा केंद्र थेट अबूधाबी दाखवण्यात आले. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर मोठा गोंधळ उडाला. परीक्षेला अवघे 24 तास शिल्लक असताना पासपोर्ट, व्हिसा आणि परदेश प्रवासाची प्रक्रिया पूर्ण करून अबूधाबीला पोहोचणे कोणत्याही विद्यार्थ्यासाठी अशक्य असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. या प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या मानसिक तणावातही मोठी भर पडली आहे.

घोर कलियुग आहे, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाऊ, खा. ओमराजेंनी भूमिका केली स्पष्ट

घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या पालकांनी NTAच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार नोंदवली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीत ही तांत्रिक चूक असल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र बदलून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. मात्र, परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी झालेल्या या गंभीर त्रुटीमुळे पालकांनी NTAच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेसंदर्भातील माहिती जलदगतीने पोहोचवण्यासाठी NTAने अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केले आहे. परीक्षा केंद्र, प्रवेशपत्र आणि इतर महत्त्वाच्या सूचनांची माहिती या माध्यमातून उमेदवारांना दिली जाणार असल्याचे एजन्सीने स्पष्ट केले आहे. मात्र, अशा गंभीर तांत्रिक चुका टाळण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने परीक्षेच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आता NTA विद्यार्थ्याचे केंद्र वेळेत बदलून नागपूर किंवा जवळच्या परिसरात उपलब्ध करून देते का, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. NEETसारख्या देशातील सर्वात महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेत अशा प्रकारच्या चुका घडत असल्याने परीक्षाव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरही चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version