Download App

Nana Patole : …तर भाजप नामानिराळा कसा? नाना पटोलेंनी घेतला पंतप्रधान मोदींचा समाचार

मुंबई : 25 वर्षांपासून शिवसेनेसोबत असलेला भाजप नामानिराळा कसा काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत विविध विकास कामांचं उद्घाटन करताना विरोधकांवर टीका केलीय. त्यानंतर नाना पटोलेंनी सवाल उपस्थित करीत प्रत्युत्तर दिलंय. यावेळी नाना पटोलेंनी चांगलाच समाचार घेतला आहे.

पुढे बोलताना पटोले म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षच सत्तेत सहभागी होता हे मोदींना माहित नाही का? मुंबई व महाराष्ट्राचा विकास झाला नाही पण मागील सहा महिन्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमुळेच विकासाची गती वाढली, असा दावा करताना मुंबई महानगरपालिकेच्या कारभावराही त्यांनी टीका केली.

शिवसेनेने विकास केला नाही किंवा भ्रष्टाचार केला असेल तर त्यांच्याबरोबर २५ वर्षे सत्तेत असलेला भाजपा कसा काय नामानिराळा राहू शकतो ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

उपमहापौरपदासह विविध पदे भाजपाकडेही होती मग भ्रष्टाचारचा वा विकास झाला नसल्याचे खापर एकट्या शिवसेनेवर कसे फोडता येईल. जे काही झाले असेल त्यात भाजपाचाही तितकाच वाटा आहे हे पंतप्रधान मोदी विसरले काय असंही त्यांनी यावेळी म्हंटलंय.

मुंबईत आज ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले, त्या प्रकल्पाची सुरुवात महाविकास आघाडी सरकार असतानाच झाली होती, ती काही मागील सहा महिन्यात झालेली नाहीत परंतु ते सर्व आपणच केले आहे अशा अविर्भावात त्याचे श्रेय मात्र घेतल्याचं त्यांनी म्हंटलंय.

आजच्या भाषणात पंतप्रधांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा दोन तीनदा उल्लेख केला पण शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना व राज्यपाल कोश्यारी यांना चार खडे बोल सुनावले असते तर बरे झाले असते पण मोंदींनी ते केले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, मुंबईकरांचे जीवन सुखकर करण्याचे बोलत असताना त्यांच्या आजच्या कार्यक्रमामुळे मुंबईकरांचे किती हाल झाले? याचाही त्यांना व भाजपाला विसर पडला असा टोलाही पटोले यांनी लगावलाय.

Tags

follow us