आरोग्य संवाद यात्रेत हलगर्जीपणा भोवला! ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

Prakash Abitkar : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 1 नोव्हेंबर 2026 रोजी यात्रेच्या पहिल्याच दिवशी नांदेड जिल्ह्यातील पाहणी केली होती.

News Photo   2026 11 06T173355.702

Prakash Abitkar

Prakash Abitkar :  नांदेडमधील आरोग्य संवाद यात्रेदरम्यान शासकीय (Nanded) आरोग्य संस्थांमधील कामकाजात अनेक त्रुटी आढळल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी यात्रेच्या पहिल्याच दिवशी नांदेड जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली होती. या दौऱ्यात रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, डॉक्टरांची उपस्थिती आणि आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीतील त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानंतर ११ जणांवर कारवाईचे आदेश देण्यात आले असून आणखी १० जणांच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी लोहा, मुखेड, हिमायतनगर आणि सोनखेड परिसरातील शासकीय दवाखाने व रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. या पाहणीत आरोग्य सेवांमधील अनियमितता आणि कामकाजातील त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार ६ डॉक्टर, २ आयडीडब्ल्यू इंजिनिअर, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील २ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि २ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संबंधितांपैकी चार जणांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडमध्ये विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत यात्रेदरम्यान समोर आलेल्या तक्रारी आणि त्रुटींची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याची कामानुसार जबाबदारी निश्चित करावी, त्यांच्या कामाचे नियमित मूल्यमापन करावे आणि गरजेनुसार बदलीचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. आरोग्य संस्थांमधील कारभारात सुधारणा करण्यासाठी या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर तटकरे यांचं मोठं विधान; अजित दादांच्या त्या वक्तव्याचीही काढली आठवण

या आढाव्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती, रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे आणि औषधांचा अपुरा साठा अशा बाबी समोर आल्या होत्या. काही रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणे बंद असल्याचे, प्रयोगशाळा तपासण्या आणि एक्स-रे सुविधांमध्ये अडचणी असल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय रुग्णालयांतील स्वच्छता, पिण्याचे पाणी, रुग्णवाहिका सेवा आणि शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींची नोंद घेण्यात आली. सर्व आरोग्य संस्थांमध्ये २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध ठेवण्याचे आणि रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

चौकशीअंती सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या आहेत. लोहा येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हिमायतनगर तालुक्यातील दुधड आणि काडली उपकेंद्रांतील दोन समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावरील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांची सेवा तत्काळ प्रभावाने समाप्त करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागातील प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि जिल्हा लेखा व्यवस्थापक यांनाही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्यावरील पुढील प्रशासकीय कारवाई राज्य स्तरावरून केली जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. सतीशकुमार सोळंके, आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्या पथकाने संबंधित आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी दिल्या होत्या. या तपासणीनंतर जबाबदारी निश्चित करून कारवाईची प्रक्रिया राबवण्यात आली.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने १ नोव्हेंबरपासून नांदेड येथून आरोग्य संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. ही यात्रा ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार असल्याचे नियोजन होते. या उपक्रमांतर्गत आरोग्यमंत्र्यांनी रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधला. प्रत्येक जिल्ह्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २ ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचतो का, याचीही तपासणी करण्यात येत आहे.

आरोग्य संवाद यात्रेदरम्यान मिळालेल्या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर बदली, सेवा समाप्तीचा प्रस्ताव आणि कारणे दाखवा नोटीस अशा स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा आढळल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिला आहे. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेवांमधील दिरंगाई आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version