Raigad And Nashik Guardian Minister Names Finally Announced : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. शासनाकडून आज दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही काळापासून रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर पडला होता. अखेर आजच्या निर्णयामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले सुरुवातीपासूनच आग्रही होते. रायगडची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी रायगडमध्ये गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.
दुसरीकडे, नाशिकची जबाबदारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदाला विशेष महत्त्व आहे. यापूर्वीही महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाची मागणी केल्याचे सांगितले होते. आता पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्याने दोन्ही जिल्ह्यांतील विकासकामांना आणि प्रशासकीय निर्णयांना अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. रायगडची धुरा भरत गोगावले आणि नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्या खांद्यावर आल्याने महायुतीतील या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
