‘ही ब्याद शिवसेनेत घेऊ नका’; सुनील तटकरेंवर आमदार महेंद्र दळवींची जहरी टीका, गोगावलेंना थेट सल्ला!

Mahendra Dalvi on Sunil Tatkare: आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत राजकीय वातावरण तापवलं.

Mahendra Dalvi on Sunil Tatkare

Mahendra Dalvi on Sunil Tatkare: रायगडच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. माणगावमध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत राजकीय वातावरण तापवलं. ‘यापुढे तटकरेंचा राजकारणात जन्म होणार नाही’. एवढंच नाही, तर भविष्यात तटकरे शिवसेनेत येण्याचा प्रयत्न करत असतील, तर राष्ट्रवादीची ही ब्याद शिवसेनेत घेऊ नका, अशी आक्षेपार्ह टिप्पणी करत दळवींनी मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना सल्लाही दिला.

ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा

दळवी यांच्या भाषणात तटकरे यांच्याविषयीचा नाराजीचा सूर स्पष्टपणे दिसून आला. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी होणार असल्याचा दावा करत येत्या काही दिवसांत पक्षाला मोठा धक्का बसेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. तटकरे यांच्यावर स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. रायगडमध्ये एखादी राजकीय घडामोड घडली की लगेच वरिष्ठांकडून फोन येतात, असं सांगत त्यांनी तटकरे यांच्या राजकीय हस्तक्षेपावरही प्रश्न उपस्थित केले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबंधांवर बोलताना दळवी यांनी दोन्ही पक्षांमध्ये आता केवळ मतभेद राहिलेले नसून मोठी दरी निर्माण झाल्याचं म्हटलं. तसंच, ‘आता आमचा गिअर बदलला आहे. भरत गोगावले यांनी गिअर बदलला नाही, तर आम्ही नक्कीच बदलू’, असा इशाराही त्यांनी दिला. तटकरे यांनी गोगावले यांना जास्त न बोलण्यासंदर्भात फोन केल्याचा दावाही दळवींनी केला.

माणगावमध्ये तटकरेंच्या समर्थकांनी सोडली राष्ट्रवादी

दळवी यांच्या या टीकेला माणगावमधील पक्षप्रवेशाची पार्श्वभूमीही आहे. सुनील तटकरे यांचे समर्थक मानले जाणारे काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. माजी नगरसेवक संदीप खरगटे, दिलीप जाधव, जयंत बोरडे, रत्नाकर उभारे, भाग्यश्री यादव आणि माजी उपनगराध्यक्ष नीलिमा मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय शेकडो कार्यकर्तेही शिंदेसेनेत दाखल झाले.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, ‘विलीनीकरणाबाबत खरोखर चर्चा सुरू…’

मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे, मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या राजकीय प्रभावक्षेत्रात घडलेल्या या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर स्थानिक पातळीवर नवं आव्हान निर्माण झालं आहे.

‘रायगडचा खासदार शिवसेनाच ठरवणार’

या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनीही तटकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. आगामी काळात रायगडचा खासदार कोण असेल, हे शिवसेना ठरवेल, असा दावा त्यांनी केला. महाडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षप्रवेश घडवून आणले तर त्यावर आक्षेप घेतला जात नाही; मात्र श्रीवर्धनमध्ये शिवसेनेने प्रवेश घडवून आणला की त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, अशी टीका विकास गोगावले यांनी केली.

भारताने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला धूळ चारली, 19 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

एकीकडे माणगावमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं पक्षांतर, तर दुसरीकडे सुनील तटकरे यांच्यावर शिंदेसेनेच्या आमदारांकडून थेट टीका, अशा घडामोडींमुळे रायगडमधील राजकीय संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगामी काळात या संघर्षाचा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us