Nashik TCS case in discussion again : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचारी लैंगिक अत्याचार आणि कथित सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात आता तपासाचा महत्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या चौकशीत पोलिसांच्या हाती अनेक महत्वाचे पुरावे लागले असून, आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या सर्व नऊ गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या चार्जशीटमधून 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या कथित मानसिक, शारीरिक आणि धार्मिक छळाचा तपशील समोर आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी पीडित तरुणीच्या धर्मांतरासंदर्भातील काही महत्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. चार्जशिटनुसार, आरोपींनी तिचे नाव बदलल्याचे नमूद करण्यात आले असून, मुख्य आरोपी निदा खान हिने पीडितेला स्वतःच्या घरी नेऊन नमाज पठणाचे प्रशिक्षण दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच पीडितेच्या मोबईल फोनच्या तपासणीत इस्लाम धर्माशी संबंधित 37 ऑडिओ क्लिप आणि चार इस्लामिक अँप्स आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पीडितेच्या कथित ब्रेनवॉश करण्यात आल्याचा आरोप. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार, धर्मांतरासाठी पीडितेला सोशल मीडियावरील काही धार्मिक व्हिडिओ दाखवले जात होते. चार्जशीटमध्ये झाकीर नाईक यांच्या व्हिडिओंचा उल्लेख करण्यात आला असून, त्याद्वारे पीडितेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारतीय शेअर बाजाराला; सेन्सेक्स 821 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण
तपासात आरोपी दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान यांनी संगनमत करून पीडितेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. चार्जशिटनुसार, 2022 मध्ये पीडितेला नोकरी मिळवून दिल्यानंतर तिच्यावर विविध प्रकारे दबाव टाकण्यात आला. दानिश शेख याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचा केल्याचा आरोप आहे. याशिवाय जातीवाचक अपमान आणि मानसिक छळ देखील केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर मतीन पटेल याच्यावर निदा खानला आश्रय देऊन अटक टाळण्यास मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
चार्जशीटमध्ये पीडितेवर धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव आणल्याचे देखील नमूद आहे. तिच्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने काही अँप्स डाउनलोड करण्यात आल्याचा आरोप असून, धार्मिक व्हिडिओ, रिल्स आणि साहित्य पाहण्यास भाग पाडले जात होते. नमाज पठण, रोजा आणि बुरखा-हिजाब परिधान करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे देखील तपासात समोर आले आहे. भीतीचे वातावरण निर्माण करून तिचे मानसिक खच्चीकरण केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
याशिवाय, मुख्य आरोपी दानिश शेख याने पिडीतेकडून किंमती वस्तू आणि रोख रक्कम घेतल्याचा आरोप आहे. तर दुसरा आरोपी तौफिक अत्तार याने कार्यालयाच्या पॅन्ट्रीमध्ये पीडितेच्या विनयभंग करून अश्लील वर्तन केल्याचे देखील चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवर आता पुढील सुनावणीदरम्यान काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपास यंत्रणांकडून अद्याप अधिक सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणातून पुढे आणखी कोणते खुलासे समोर येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
