Download App

नागपूरला जातानाच राष्ट्रवादी देणार CM शिंदेंना टेन्शन : जयंत पाटलांकडून शेतकरी आक्रोश मोर्चाची घोषणा

मुंबई : दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या याच विविध प्रश्नांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. 30 नोव्हेंबरला जळगावमध्ये, 1 डिसेंबरला दिंडोरीत आणि 5 डिसेंबरला अमरावतीमध्ये हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चादरम्यान ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nationalist Congress Party (Sharad Pawar) group is going to hold a farmers’ protest march before the winter session)

जयंत पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. आधी दुष्काळाने होरपळलेला शेतकरी आता अवकाळी पावसाने हैराण झाला आहे. या पावसामुळे आलेली पिकेही वाया गेली. काही पिकांवर रोगराई पसरली आहे. जी पिके शिल्लक आहेत त्यांना बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही. एकूणच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमचा हा शेतकरी आक्रोश मोर्चा असणार आहे.

‘कुठल्या देशातले, शहरातले लोक राऊतांना पप्पा बोलतात, याची यादी…’; नितेश राणेंचा इशारा

या सरकारची अडचण अशी आहे की, त्यांना काहीही सांगितले तर ते महाविकास आघाडीकडे बोट दाखवतात. पण ते आज जे काही करत आहेत ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आमच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोनाचे संकट मोठे असतानाही महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली. शेतकऱ्यांना कधीही पैसे कमी पडून दिले नाहीत. प्रत्येक संकटे जेव्हा जेव्हा आली त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे राहले आहे. हा त्यावेळेचा सगळ्यांचा अनुभव आहे. आज सरकारतर्फे नुसत्या घोषणा होत आहेत व त्या घोषणांची अंमलबजावणी काही होत नाही, असा आरोपही यावेळी पाटील यांनी केला.

‘अयोध्येत नवा प्लॅन ठरणार, दंगली घडणार’; प्रकाश आंबेडकरांचं भाकीत

अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार :

यावेळी पाटील यांनी येत्या अधिवेशनात सरकारला धारेवरच धरणार असल्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, सात तारखेला अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना आणि आम्ही सहा तारखेला एकत्र बैठक घेऊ. यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि वेगवेगळे मुद्दे चर्चिले जातील.

यात निधीचे असमान वाटप हा मुख्य विषय असणार आहे. याबाबतची तक्रार वेगवेगळ्या भागताल्या विधानसभेच्या सदस्यांची आहे. हाजिर तो वजीर अशी परिस्थिती या सरकारमध्ये आहे. जो मंत्रालयात जातो, जो ठाण मांडून बसतो, तो जास्त पैसे घेऊन जातो. त्यामुळे सत्तारुढ असणाऱ्या आमदारांपैकी कोणी 300 कोटी मिळवले, कोणी 100 कोटी मिळवले आणि कोणी 50 कोटी मिळवले. ही तफावत सत्तारुढ आमदारांमध्ये आहे. त्यामुळे सत्तेतल्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

सत्तेत असणाऱ्या नेत्यांनाही निधीचे समान वाटप होत नाही. शिंदे गटाकडे गेलेले पैसे बघा, राष्ट्रवादीकडून सत्तेत जाऊन बसलेल्या आमच्यापैकी काही सहकाऱ्यांना किती पैसे मिळाले ते बघा आणि सर्वात मोठा भारतीय जनता पक्ष आहे, त्यांना मिळालेले पैसे बघा. याची तुलना केल्यावर लक्षात येईल की, किती असमानतेचे धोरण या सरकारमध्ये आहे. बाकी विरोधी पक्षाचे तर लांबच राहिले. पण त्यांच्या त्यांच्यातच तफावत आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या विधीमंडळात आता निघतील असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.

Tags

follow us