बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात (Beed) एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक घटना घडली आहे. माजलगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष दीपक जगन्नाथ जाधव यांच्या स्वामी विवेकानंद नगर येथील निवासस्थानासमोर एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नवनाथ गणपत पवार (रा. वारोळा) असे या व्यक्तीचे नाव आहे. लाखोंची थकीत रक्कम मिळत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित नवनाथ पवार आणि माजी अध्यक्ष दीपक जाधव यांच्यात जुनी मैत्री होती. याच विश्वासापोटी पवार यांनी जाधव यांना मोठी आर्थिक मदत केली होती. मात्र, अनेक वर्षे उलटूनही आणि वारंवार मागणी करूनही जाधव ही रक्कम परत करत नव्हते. अखेर न्याय मिळवण्यासाठी नवनाथ पवार यांनी गेल्या 15 जूनपासून आपल्या कुटुंबासह थेट जाधव यांच्या घरासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.
जैन पत्रा उद्योगावर पोलिसांचा छापा, बीडमध्ये टाटा कंपनीची लोगो लावून बनावट पत्र्यांची विक्री
दरम्यानच्या काळात काही मध्यस्थांनी यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही पैसे हाती न आल्याने निराश झालेल्या पवार यांनी शुक्रवारी (10 जुलै) सकाळी कुटुंबीयांसमवेत जाधव यांच्या दारात येत थेट विष प्राशन केले. नवनाथ पवार यांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळताच माजलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, यानंतर तिथे तब्बल पाऊण तास हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गंभीर अवस्थेत असलेल्या नवनाथ पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास त्यांच्याच कुटुंबीयांनी तीव्र विरोध केला. आधी आमची थकीत रक्कम द्या, अन्यथा आमचा माणूस मेला तरी हरकत नाही अशी आक्रमक आणि टोकाची भूमिका घेत कुटुंबाने रुग्णवाहिका अडवून धरली.
यावेळी पोलिसांचीही मोठी तारांबळ उडाली आणि परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस आक्रमक झाले. पोलिसांनी बळजबरीने नवनाथ पवार यांना ताब्यात घेतलं आणि रुग्णवाहिकेत टाकून माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. सध्या पवार यांच्यावर तातडीने उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका राजकीय नेत्याच्या घरासमोर घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.
