मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या 13 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काल (22 सप्टेंबर) ही याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 पैकी 10 आमदार विधानसभेचे आणि 3 आमदार विधान परिषदेचे आहेत. (NCP (Ajit Pawar) group has filed a disqualification petition against 13 MLAs of the NCP (Sharad Pawar) group)
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाकडून एकमेकांना शह-काटशह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी शरद पवार गटाने अजित पवार आणि शपथ घेतलेल्या 9 आमदारांसह एकूण 40 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आता अजित पवार गटाकडूनही शरद पवार गटाच्या आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे.
अजित पवार गटाकडून विधानसभेच्या दहा आणि विधानपरिषदेच्या तीन आमदारांविरोधात याचिका दाखल केली. यामध्ये विधानसभेतील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर तर विधानपरिषदेतील, शशिकांत शिंदे, अरुणकाका लाड, एकनाथ खडसे यांचा समावेश आहे.
शरद पवार गटाने अजित पवारांसह नऊ मंत्री आणि 31 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यात विधानसभेचे 35 आणि विधान परिषदेचे 5 आमदार आहेत. पण हे नेमके कोणते आमदार याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. तर विधान परिषदेच्या पाच आमदारांमध्ये आमदार रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, विक्रम काळे आणि सतीश चव्हाण यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर दावा केला होता. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड चुकीचं असल्याच सांगत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. परंतु अजित पवार गटाचे दावा शरद पवार गटाने फेटाळला आहे. परंतु निवडणूक आयोगाने अद्याप पक्ष फुटीची नोंद घेतलेली नाही. दोन्ही बाजूची उत्तरे ऐकल्यानंतरच निवडणूक आयोग पुढील निर्देश देणार असल्याची माहिती मिळत आहे.