Download App

वादग्रस्त वक्तव्ये अंगलट! अमोल मिटकरींची सहा महिन्यातच ‘मुख्य प्रवक्तेपदावरुन’ उलचबांगडी

मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील (Umesh Patil) यांची नियुक्ती केली आहे. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीची बंडाळीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महिला प्रदेशाध्यक्षपदी तर अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या सहा महिन्यांच्या आत त्यांचे मुख्य प्रवक्ते पद काढून घेण्यात आल्याने त्यांना वादग्रस्त वक्तव्ये भोवल्याची चर्चा आहे.(NCP (Ajit Pawar) MLA Amol Mitkari has been removed from the post of Chief Spokesperson)

दरम्यान, मिटकरी यांनी मात्र ही कारवाई नसल्याचे म्हणत आपण आजही पक्षाचे प्रवक्ते असल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, आपल्याकडून गैरसमज होत आहे. मला पक्षाने दणका वगैरे काही दिलेला नाही. मागच्या वेळी फक्त प्रवक्ता म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आमच्या पक्षाचे एकूण सात प्रवक्ते असून उमेश पाटील हे आता मुख्य प्रवक्ते आहेत. मुख्य प्रवक्ता हा मुंबईत किंवा पुण्यात राहणारा असावा, मी अकोल्यात राहतो. तिथून राजकीय घडामोडी आणि इतर घटनांवर तातडीने भाष्य करणे शक्य होत नाही. पक्षाशी योग्य समन्वय साधता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. यानंतर मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचे मिटकरी यांनी अभिनंदनही केले.

Rohit Pawar : ‘राष्ट्रवादी’चा निकाल अजितदादांच्या विरोधात? रोहित पवारांनी नेमकं काय सांगितलं

याबाबत बोलताना पाटील यांनीही मिटकरी यांच्यावर ही कारवाई नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आपल्याकडून गैरसमज होत आहे. आमच्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदी अद्यापपर्यंत नियुक्तीच झालेली नव्हती. ज्या काही नियुक्त झाल्या होत्या त्या पक्षाच्या प्रवक्तांच्या नियुक्ती झाल्या होत्या. मुख्य प्रवक्ते एक स्वतंत्र पद आहे. ते प्रमुख पद आहे. यापूर्वी नवाब मलिक हे या पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते. पण त्यांच्या वैद्यकीय आणि इतर अडचणीमुळे ते सध्या पूर्णवेळ कार्यरत नाहीत.  त्यांचे जे पद होतं ते पक्षामध्ये रिक्त होते, त्या मुख्य प्रवक्ते पदी आज सुनील तटकरे आणि अजित दादा यांनी माझे नियुक्ती केली आहे.  मी, अमोल मिटकरी, आनंद परांजपे किंवा सूरज चव्हाण असे आमचे सात जण प्रवक्ते आजही कायम आहेत. ते पक्षाच्या प्रवक्ता पॅनलमध्ये काम करणार आहेत. त्या सर्व प्रवक्ता पॅनलचा प्रमुख म्हणून ‘मुख्य प्रवक्ता’पदी वर्णी लागली आहे, असेही त्यांनी सांगितले.

follow us