NCP Chaggan Bhujbal Reaction After Rejected Ministerial Post : राज्यात 14 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा (Mahayuti) शपथविधी पार पडला. मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chaggan Bhujbal) यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रिपदाचा प्रश्न नाही अवहेलना झाली. पद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. उमेदवारी देतानाही वाट पाहावी लागली, यापुढे वाट पाहणार नाही. माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते. मी लोकसभा मागितली राज्यसभा मागितली दिली नाही.महाराष्ट्रात गजर म्हणून मला विधानसभा लढायला सांगितली.
मनोज जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर; संजय राऊतांचा गंभीर आरोप
चार सहा महिन्यांपूर्वी मी राज्यसभेवर पाठवा म्हणून सांगितलं होतं. तेव्हा माझं ऐकलं नाही. आणि आता मला सांगत आहेत. मी काय लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केलाय. चर्चा करू, बसू असे म्हणाले पण चर्चेला बसलेच नाही. प्रफुल पटेलांशी फोनवर बोलून सर्व ठरवतात. माझ्या समर्थकांच्या भूमिका मी सध्या ऐकून घेतोय, असे म्हणत मी काय तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? आमदारकी सोडली तर, मतदारसंघातल्या लोकांना काय वाटेल असं देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मी सहा महिन्यांपूर्वी राज्यसभेवर जाण्याची इच्छा वरिष्ठांपुढे व्यक्त केली होती. परंतु, तेव्हा त्यांनी मला नकार दिला. ते मला म्हणाले, आता आपण सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार आहोत. माझी काही हरकत नव्हती. त्यानंतर त्यांनी मकरंद पाटील यांच्या भावाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा देखील मी राज्यसभेचा विषय काढला होता. मात्र वरिष्ठांनी मला नकार दिला. तेव्हा मला सांगण्यात आलं की, तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघात विजय मिळणं कठीण आहे. तुम्ही निवडणूक लढत असाल तर आपले कार्यकर्ते जोमाने राज्यभर काम करतील. मी त्यावरही हरकत घेतली नाही.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आता मी विधानसभा निवडणुकीत जिंकलो आहे. आता ते लोक मला म्हणतात की आपण मकरंद पाटील यांना मंत्री केलं आहे. आता त्यांच्या भावाला आपण राजीनामा द्यायला सांगू आणि तुम्हाला आपण राज्यसभेवर पाठवू. परंतु, त्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी असं केलं तर ही माझ्या मतदारसंघातील लोकांची प्रतारणा होणार नाही का? मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?
आलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या वेदना आणि दुःख मांडले. मी पण त्यांना जे घडले आहे, ते सांगितलं. मी माझ्या मतदार संघात आज जातोय. उद्या पुन्हा एक समता परिषेदेची बैठक आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा आहे. सुसंस्कृतपणे आपल्या भावना व्यक्त करा, असं सांगितलं. जोडे मारो आंदोलन करू नका, असं आवाहन मी केलंय. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्या प्रकारे अवहेलना केली त्याचा आहे. पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात. आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील मला वरुन निवडणूक लढण्यासाठी सांगितले होते. एक महिना झाला तरी माझं नाव जाहीर झाले नाही. माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत आग्रह धरला होता.
मी 40 वर्षांपासून मी इथे आहे, म्हणून मला राज्यसभा द्या अशी माझी मागणी होती. पण आता मी आता लढलो. आता मला जाण्यासाठी सांगत आहेत. प्रफुल पटेल, समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत, ते त्यांच्याशी बोलत आहेत. तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल, तेव्हा खाली आणणार मी तुमच्या हातातला खेळणं आहे का? असा संतप्त सवाल देखील भुजबळांनी केलाय. तुम्ही उठ म्हणाले की उठ आणि बस म्हणाले की बस, हे ऐकणारा छगन भुजबळ मनुष्य नाही.
मोठी घडामोड! अजितदादा २४ तासांपासून नॉट रिचेबल; पडद्यामागं काय घडतंय?
राज्यात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या नव्या सरकारमधील 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 11 आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. यामध्ये काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्याचं समोर आलंय.
मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झालेत. मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हे शोधण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करत आहे. भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे.