Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचा जीव गेला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्रीय रल्वेमंत्र्यांनी नैतिक जबादारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी नेत्यांनी केली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची एक आठवण सांगितली.
पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना बालासोर येथील रेल्वे अपघाताबाबत विचारले. त्यावेळी पवार यांनी माजी रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, या रेल्वे अपघाताची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यानंतर सत्य समोर येईल. मात्र लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री असताना दुसरा मोठा रेल्वे अपघात झाला होता. त्यावेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या राजीनाम्याच्या विरुद्ध होते. तरीसुद्धा शास्त्री यांनी नैतिक जबाबदारी म्हणत राजीनामा दिला होता. आता हे एक उदाहरण देशासमोर आहे. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आजच्या राज्यकर्त्यांना जे वाटत असेल ते त्यांनी करावे, अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.
Odisha Train Accident : अपघाताची घटना वेदनादायी; दोषींना माफी नाही
दरम्यान, याआधी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा रेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची मागणी केली होती. पवार म्हणाले, मला माहित आहे की राजीनामा दिल्याने प्रश्न काही सुटणार नाही. तरीदेखील रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खालच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी वाढेल.