Sharad Pawar on Z+ Security : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना (Sharad Pawar) झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र राज्य सरकारची सुरक्षा मिळत असताना केंद्राने सुरक्षा देण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं. त्यानंतर आज शरद पवार यांनी थेट सुरक्षा व्यवस्थाच नाकारल्याची बातमी आली आहे. सुरक्षा यंत्रणांचे वाहन घेण्यासही शरद पवारांनी नकार दिला. केंद्रीय गृहमंत्र्यांचे अधिकारी आज सकाळीच शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. सीआरपीएफच्या पंधरा अधिकाऱ्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. परंतु,यावर काही तोडगा निघेल याची शक्यता दिसत नाही.
Sharad Pawar : मुख्यमंत्र्यांचं ‘ते’ वक्तव्य योग्य नाहीच; शरद पवारांचं CM शिंदेंना प्रत्युत्तर
आपल्याला झेड प्लस सुरक्षा का दिली जात आहे याचं उत्तर मिळालेलं नाही. यामागे काय कारण आहे याचीही माहिती नाही. गृह मंत्रालयाच्या या निर्णया पाठीमागे काय कारण आहे याची माहिती माझ्याकडे नाही. अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की माझ्या व्यतिरिक्त आणखी दोन जणांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात मला अनेक ठिकाणी फिरावं लागत आहे. तेव्हा माझ्याबद्दल माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने कदाचित मला सुरक्षा व्यवस्था दिली जात असावी अशी शंका शरद पवारांनी उपस्थित केली होती. परंतु, आता शरद पवारांनी ही सुरक्षाच नाकारली आहे. त्यांनी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना माघारी पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
सुरक्षेमधील काही अटी शरद पवारांना मान्य नाहीत सूत्रांकडून कळतंय. या बैठकीत सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. यात त्यांनी काही अटी टाकल्या आहेत. यातील महत्वाची अट म्हणजे शरद पवारांना गाडी बदलण्यास सांगण्यात आले आहे. मात्र पवारांनी त्यांनी नकार दिल्याचं समजत आहे. दुसरे म्हणजे दिल्लीतील त्यांच्या घराचे जे वॉल कंपाउंड आहे त्याची उंची वाढविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरद पवारांच्या वाहनात सुरक्षा यंत्रणेचा एक माणूस उपस्थित असेल असे सांगण्यात आले होते. मात्र ही अट शरद पवारांनी नाकारली.
झेड प्लस सुरक्षा म्हणजे काय? VIP अन् नेत्यांना किती प्रकारची सुरक्षा, जाणून घ्या डिटेल
झेड प्लस सुरक्षेत दहापेक्षा जास्त एनएसजी, एसपीजी कमांडो, पोलीस यांच्यासह एकूण 55 सुरक्षा कर्मचारी असतात. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आणि सीआरपीएफचे जवानही यात तैनात असतात. या कमांडोंचं काम संबंधित व्यक्तीची चोवीस तास सुरक्षा करणे हेच असते. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनेही असतात. अतिशय महत्वाच्या व्यक्तींनाच ही सुरक्षा दिली जाते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षेत एनएसजी कमांडो तैनात असतात आणि हे कमांडो पूर्णपणे प्रशिक्षित असतात. या सुरक्षा व्यवस्थेतील जवान कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास कायम तयार असतात. या जवानांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची हत्यारे असतात.