Download App

Nashik : सभा ठरली, शिलेदार भेटला; शरद पवारांनी आवळला भुजबळांभोवतीचा राजकीय ‘फास’

मुंबई : राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बाह्या सरसावून मैदानात उतरले आहेत. बंडाला 24 तास होण्यापूर्वीच त्यांनी थेट कराड गाठून दिवगंत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत शक्तीप्रदर्शन करत बंडखोरांना जागा दाखवून देणार असल्याचं सांगितलं. यानंतर आता शरद पवार बंडखोरांना जागा दाखविण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 8 जुलैपासून ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. (Ncp leader Sharad Pawar will held rally in Nashik in Chhagan Bhujbal’s Constituency)

दरम्यान, या दौऱ्यातील पहिलीच सभा शरद पवार छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात घेणार आहेत. 1995 मध्ये भुजबळ यांचा विधानसभेला पराभूत झाल्यानंतर पवार यांनी त्यांना विधानपरिषदेवर आमदार केलं. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्षपद, उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद अशी मोठी पद दिली. मात्र त्यानंतरही त्यांनी बंडखोरी करत अजित पवार यांची साथ दिली, अशी भावना नाशिकमधील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. भुजबळांविरोधातील याच असंतोषाच्या वातावरणात पवार त्यांच्या मतदारसंघातल पहिली सभा घेणार आहेत.

‘कायदा आम्हालाही कळतो, सगळा विचार करूनच निर्णय घेतला’; भुजबळांनी जयंत पाटलांना ठणकावले!

शरद पवार त्यांच्या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातून करणार आहेत. 8 जुलैला पवार नाशिकमध्ये पहिली सभा घेणार आहेत. तर 9 जुलैला धुळे आणि 10 जुलैला जळगावला जाणार आहेत.

दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी भुजळांच्या मतदारसंघात त्यांच्या कट्टर विरोधकाला आणि आपल्या जुना शिलेदाराला पुन्हा अॅक्टिव्ह केलं आहे. नाशिक जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष ॲड. माणिकराव शिंदे यांनी आज (5 जुलै) शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता भुजबळांविरोधात पवार शिंदे यांना उतरविणार असल्याचं बोललं जात आहे.

अॅड. माणिकराव शिंदे या काही वर्षांपूर्वीपर्यंत शरद पवार यांचे निष्ठावंत आणि भुजबळांचे उजवा हात समजले जायचे. त्यांनी भुजबळ यांना 2004 च्या विधानसभा निवडणुकीत येवल्यात आणलं होतं. भुजबळ यांना 3 हजार जणांच्या मेळाव्याची अपेक्षा असताना शिंदे यांनी तब्बल 20 हजार जणांची गर्दी जमवली होती, असं सांगितलं जातं. यावरुन शिंदे यांची येवल्यात मोठी ताकद असल्याचं सिद्ध झालं होतं.

‘साहेब, बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशिर्वाद द्यायला या’; भुजबळांची आर्त साद!

त्यानंतर शिंदे यांनी 2009 मध्ये शिवसेनेतून निवडणूक लढवली. मात्र भुजबळांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. शिंदे पराभूत झाले. पुन्हा राष्ट्रवादीत आले. 2014 च्या निवडणुकीत भुजबळांची साथ दिली. ते पुन्हा आमदार झाले. त्यानंतर 2019 मध्ये शिंदे यांनी मतदारसंघावर दावा ठोकला. त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात देत थेट भुजबळ यांनीच आपल्याला उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली. मात्र राष्ट्रवादीने भुजबळांना उमेदवारी जाहीर केली आणि शिंदेंनी पुन्हा बंडखोरी केली. आता मात्र शिंदे पुन्हा पवारांकडे परतले आहेत. आता आगामी काळात येवल्यामध्ये शिंदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Tags

follow us