नांदेड : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील घटनेत डीनवर कारवाई नाही आणि नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांची जात पाहून त्यांना घरी बसवलं असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या आरोपांनी शिंदे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. (NCP MLA Jitendra Awad alleged that Shankarao Chavan Medical College and Hospital Dr. S. R. Wakode was suspended because of his caste)
आव्हाड म्हणाले, मृत्यू हा मृत्यू असतो. ठाण्यात जेव्हा घटना घडली तेव्हा त्याच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला माणूस मी होतो. अतिशय वाईट अवस्था होती. एका ऑर्थोपेडिक सर्जनला तुम्ही डीन म्हणून बसवून ठेवला होता. त्याला काही समजत नव्हतं. चौकशी अहवाल येईल अशी वाट बघत आहे. पण नांदेडच्या डॉ. वाकोडे यांना हाकलून दिलं, घरी बसवलं, का? अरे औषध संपली तर सरकारचं काम आहे ना ती उपलब्ध करुन देणं. डॉक्टर देणं हे सरकारचं काम आहे.
सगळं दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळं व्हायचं आणि स्वतः चादरीखाली लपायचं. का? वाकोडे यांना बाप नाही? त्यांना जात नाही? जर वाकोडे यांना एक न्याय आणि ठाण्यातील डीनला दुसरा न्याय कशासाठी? आणि ज्या ज्या रुग्णालयात मृत्यू झाले त्या प्रत्येक डीन निलंबित करा ना. पण गोळ्या नाही हॉस्पिटलमध्ये याची जबाबदारी शासनाची आहे ना? साधी पॅरासिटीमॉल नाही, असं हायकोर्ट म्हणतं. बस करा असा गरिबांचा बळी देणं आणि जाती वरती आधारित लोकांवर कारवाई करण्याची काम, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.