Download App

INDIA Meeting : पवारांकडे ‘इंडिया’ची धुरा येणार? मल्लिकार्जून खर्गेंना मागे टाकत ऐनवेळी नाव चर्चेत

INDIA Alliance Meeting : मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance Meeting) संयोजकपदासाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव मागे पडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. शरद पवार यांचे सर्वपक्षीयांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा फायदा आघाडीला व्हावा असा होरा यामागे असल्याचे सांगितले जात आहे. (NCP National President Sharad Pawar’s name came into discussion for the post of India Alliance Meeting convener)

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आज (दि.31) आणि उद्या म्हणजेच (दि.1) रोजी मुंबईत पार पडणार आहे. यासाठी देशभरातील जवळपास दोन डझन पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळच्या बैठकीत लोगो अनावरण, जागा वाटप आणि संयोजकपदाबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संयोजकपदासाठी ऐनवेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विरोधकांची आघाडी म्हणजे बारूद नसलेला बॉम्ब; बावनकुळेंची खरमरीत टीका

संयोजकपदासाठी यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्याच पुढाकारातून इंडिया आघाडी आकारास आल्याचे दिसून आले. त्यांच्या नेतृत्वात पाटणामध्ये आघाडीची पहिली बैठक पार पडली होती. मात्र त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव पुढे आले. काँग्रेस हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळेच त्याच पक्षाकडे संयोजकपद असावे अशी काही पक्षांची भूमिका आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या काही नेत्यांचा खर्गेंच्या नावाला विरोध आहे.

PM मोदींनी फक्त आरोपच नाहीतर चौकशीही करावी; शरद पवारांचं खुलं आव्हान

याच सर्व घडामोडींनंतर शरद पवार यांचे नाव ऐनवेळी चर्चेत आले आहे. पवार यांचे इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांचे सलोख्याचे संबंध आहेत. या संबंधाचा फायदा आघाडीतील समन्वयासाठी होईल असा काही नेत्यांचा होरा आहे. त्यामुळे पवार यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता आहे. मात्र ते सध्या त्यांच्या पक्षातील फूट आणि महाराष्ट्रात पक्ष बांधणीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यामुळे ते हे पद स्वीकारणार का? आणि स्वीकारल्यास ते या पदाला न्याय देऊ शकणार का? असे अनेक प्रश्न समोर येऊ शकतात.

Tags

follow us