Download App

कुठला विठ्ठल अन् कसलं दैवत? : अजितदादांनी काकांनाच राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन हटवलं…

NCP Political Crisis :  अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहे. अजितदादांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. यामुळे शरद पवार गटात एकच खळबळ उडाली आहे. यावरुन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी वेगवान पाऊले उचलल्याचे समोर आले आहे. (Sharad Pawar Vs Ajit Pawar )

अजित पवार यांनी 40 आमदरांच्या ठरावाची कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. यामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या पत्रावर 30 जून ही तारीख आहे. यावर निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मगच यावर निर्णय देणार असल्याचे म्हटले आहे.

वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अजित पवारांनी निवडणुक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी दावा केला आहे. अजितदादांनी आज मुंबईतील एमईटी इन्स्टिट्यूट येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. याठिकाणी अनेक कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. तसेच याआधीच अजित पवारांनी आमदारांकडूनही प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारांनी आजच्या भाषणामध्ये शरद पवार हे आमचे विठ्ठल असल्याचे सांगितलं होतं. तसेच त्यांनी आता आम्ही केलेल्या कृतीला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. दुसरीकडे त्याच भाषणात पवारांनी आपल्याया वेळोवेळी तोंडघशी पाडले याचाही पाढा वाचला होता. पवार हे अखेरपर्यंत आपले दैवत राहतील असे वाक्य बोलून काही तास उलटायच्या आतच अजितदादांनी पवारांनाच कोंडीत पकडले आहे.

पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी पाठवले, फडणवीसांसोबत बैठका झाल्या; अजित पवारांचा गौप्यस्फोट

आज छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये आम्ही देखील सर्व तयारी केली असल्याचे सांगितले. आम्हालाही कायदा कळतो, आम्ही सगळी तयारी करुनच हा निर्णय घेतला असल्याचे भुजबळ म्हणाले होते. त्यामुळे निवडणूक आयोग आता यावर काय निर्णय घेणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत, हे विसरलात का असा प्रश्न विचारला होता. आता मात्र, स्वत:च काकांना डच्चू देण्याची तयारी त्यांनी केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी देखील शिवसेनेवर दावा केला. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार व 18 पैकी 13 खासदार बरोबर होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात आले. आता याच न्यायाने राष्ट्रवादीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us