New equations in Mahavikas Aghadi Alliance with MNS under discussion at Yashwantrao Chavan Center : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘महाविकास आघाडी’ची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक मंगळवारी (दि. 11 नोव्हेंबर 2025) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही घटक पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन निवडणूक रणनीतीवर चर्चा करत असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
मोठी बातमी, भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती
नाशिकमध्ये मनसेसोबत आघाडीची चर्चा रंगत असल्याची चर्चा असतानाच ही बैठक झाल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. काँग्रेसकडून खासदार हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे व आमदार शशिकांत शिंदे तर शिवसेना (उद्धव गट) कडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब उपस्थित होते. बैठकीनंतर नेत्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं की, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी हाच मुख्य अजेंडा होता. राज्यभरातील उमेदवारी, मतदारसंघ वाटप, आणि जिल्हास्तरीय समन्वय समित्या या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
स्थानिक पातळीवर निर्णयाचे स्वातंत्र्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, “स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आला आहे. काही तिढा निर्माण झाल्यास त्यावर समन्वयक मंडळ तोडगा काढेल. निवडणुकीच्या रणनीतीवर 17 तारखेनंतर पुन्हा बैठक होईल.”
काँग्रेसचा सावध पवित्रा
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र स्पष्ट केलं की, “मनसेसोबत युतीबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यावरच चर्चा होईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन निवडणुका एकत्र लढलो असून, समान विचार असणारे पक्ष एकत्र राहावेत ही आमची भूमिका आहे.” त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या एबी फॉर्म प्रक्रियेबाबतही सपकाळ यांनी चिंता व्यक्त केली — “दादरनगर हवेलीत १०० टक्के फॉर्म रिजेक्ट झाले. त्यामुळे आपल्यालाही सजग राहावं लागेल,” असं त्यांनी सांगितलं.
शिवसेनेचा समन्वयकांचा प्लॅन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनिल परब म्हणाले, “पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ही बैठक होती. स्थानिक पातळीवर घेतलेले निर्णय जर कुठे अडचणीत आले, तर आमचे समन्वयक त्यावर तोडगा काढतील. दुसरी बैठक 19 तारखेला होईल.”
चंदगडचा ‘अपवाद’
शशिकांत शिंदे यांनी उघड केलं की, चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत आणि तो एक ‘अपवाद’ असेल. “भाजप वगळता इतर कोणासोबत जाण्याचा निर्णय जिल्हाध्यक्षांना दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महाविकास आघाडी ताकदीने उतरलेली दिसेल,” असं त्यांनी ठाम सांगितलं. अर्थातच, बिहार निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपत असतानाच महाराष्ट्रात नव्या आघाड्यांच्या शक्यतांनी राजकारण तापायला सुरुवात केली आहे. मनसेसोबतचा संभाव्य गणितं equation, स्थानिक असंतोष आणि भाजपविरोधी रणनिती — या सगळ्यांच्या छायेत झालेली ही बैठक महाविकास आघाडीच्या भवितव्याचा पुढचा अध्याय ठरू शकते.
