New twist in Tardeo home sale dispute : मुंबईतील काही भागांमध्ये मराठी भाषिक आणि मांसाहारी नागरिकांना घरे नाकारल्याच्या घटनांवरून वाद सुरू असतानाच, आता दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील एका फ्लॅट विक्री प्रकरणाने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये इस्टेट एजंट भावेश कावरे मांसाहारी व्यक्तींना ताडदेवमधील एका इमारतीत घर मिळणार नसल्याचा दावा करताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, शाकाहारी-मांसाहारी भेदभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मात्र या प्रकरणात आता एक महत्त्वाचा ट्विस्ट समोर आला आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना भावेश कावरे यांनी व्हायरल व्हिडीओमागील संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, संबंधित फ्लॅटचा मालक हा मराठी व्यक्ती असून वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे. त्यांची इच्छा होती की, त्यांचे घर शाकाहारी व्यक्तीनेच खरेदी करावे. त्यामुळे फ्लॅट विक्रीसंदर्भात अशी अट ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे, अखेरीस हा फ्लॅट एका मराठी व्यक्तीनेच खरेदी केला असून, हा व्यवहार अत्यंत कमी कालावधीत पूर्ण झाल्याचेही कावरे यांनी सांगितले.
उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी सरकार सक्रिय; उद्योगमंत्री उदय सामंत यांची चाकणमध्ये 16 ऑगस्टला निर्णायक बैठक
नेमके प्रकरण काय?
दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरातील एका आलिशान नव्या उंच इमारतीतील फ्लॅट विक्रीवरून हा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे संभाव्य खरेदीदाराशी बोलताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी या इमारतीत फक्त शाकाहारी व्यक्तींनाच फ्लॅट विकला जाईल आणि मांसाहारी व्यक्तींना घर मिळणार नाही, असे सांगितल्याचा दावा करण्यात आला.
हा व्हिडीओ व्हायरल होताच मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक आणि विविधतेने नटलेल्या शहरात घर खरेदी किंवा भाड्याने घेताना व्यक्तीच्या खानपानाच्या सवयींवर निर्बंध घालणे योग्य आहे का, यावरून मोठी चर्चा सुरू झाली. अनेकांनी यावर आक्षेप घेतला, तर काहींनी मालकाला आपल्या मालमत्तेबाबत अटी घालण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले.
उपपंतप्रधानपदावरून मोदी-शाह यांच्यात वाद? संजय राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात चर्चांना उधाण
मुंबईत शाकाहारी आणि मांसाहारी नागरिकांना घर देण्यास किंवा विकण्यास नकार देण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. घाटकोपर, मुलुंड, कांदिवली यांसारख्या भागांमध्ये अशा तक्रारी चर्चेत आल्या होत्या. मात्र ताडदेव प्रकरणात फ्लॅटमालक स्वतः मराठी असून त्याने वैयक्तिक श्रद्धा आणि जीवनशैलीच्या आधारावर शाकाहारी खरेदीदाराला प्राधान्य दिल्याचा दावा भावेश कावरे यांनी केल्याने या वादाला नवे वळण मिळाले आहे.
या प्रकरणामुळे मालमत्ता विक्रीतील वैयक्तिक पसंती, सामाजिक स्वीकारार्हता आणि भेदभावाच्या सीमारेषा यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
