Download App

NIA : मोठी बातमी! PFI संबंधित ठिकाणांवर छापेमारी; दिल्ली, युपी, राजस्थानातही कारवाई

NIA : पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर पुन्हा एकदा सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयएकडून छापेमारी केली जात आहे. महाराष्ट्रात एकूण 3 ते 4 ठिकाणी पीएफआयवर कारवाई सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत कारवाई सुरू आहे. पीएफआय संघटनेशी संबंधित ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले. याआधीही सन 2022 मध्ये संघटनेवर मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा या संघटनेच्या नाड्या आवळण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

राजधानी दिल्लीतील हौज काझी पोलीस स्टेशनच्या बल्लीमारामध्ये भागात कारवाई सुरू आहे. याशिवाय दिल्ली-एनसीआरमध्येही अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दुसरीकडे राजस्थानातील टोंकसह अनेक ठिकाणी शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही छापे टाकले जात आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौ, बाराबंकी, बहराइच, सीतापूर, हरदोई येथे छापे टाकले आहेत. लखनौतील मदेगंज येथील बडी पकरिया परिसरातील तीन घरांवर छापे टाकण्यात आले. एनआयएच्या टीमसोबत सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांची टीमही हजर आहे.

महाराष्ट्रातील मुंबई येथील विक्रोळीतील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे.  येथील घराची झडती घेण्याच्या उद्देशाने छापा टाकण्यात आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने तामिळनाडूतील मदुराई येथील पीएफआयच्या संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

 

Tags

follow us