Nirmala Navale’s crushing defeat by Manisha Pachange : राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये शिरूर पंचायत समितीचाही समावेश आहे. कारेगाव गणातून निर्मला नवले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. भाजपच्या मनीषा पाचंगे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे. मनीषा पाचंगे यांनी या गणातून विजय मिळवला आहे. मनीषा यांनी निर्मला नवले यांचा 2700 मतांनी पराभव केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला नवले यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे तब्बल 5 लाख 38 हजारांहून अधिक फॉलोअर्स असून त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ आणि पोस्ट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली, जिल्हा परिषदेला मुलगा आमेर विजयी
कारेगावच्या सरपंचपदाचा अनुभव असलेल्या निर्मला नवले या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रियपणे कार्यरत आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच निवडणूक प्रचारात त्यांनी आघाडी घेतली होती. त्यांच्या कामगिरीची दखल घेत अजित पवारांनी त्यांच्यावर वर्किंग प्रेसिडेंट एनसीपी युवती महाराष्ट्र या पदाची जबाबदारीही सोपवली होती.
इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या निर्मला नवले या सुशिक्षित आणि प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र, या पराभवानंतर आता आगामी काळात राष्ट्रवादीकडून त्यांना पुढील संधी मिळणार का, आणि दिलीप वळसे पाटील त्यांच्या उमेदवारीबाबत काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
