अमृता खानविलकरचा इशारा; सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुराविरोधात 10 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाई
अमृता खानविलकर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
Amruta Khanvilkar’s warning : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. अमृता खानविलकर यांच्या अधिकृत कायदेशीर टीमने एक निवेदन जारी करत, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनीयतेचा भंग करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
अमृता खानविलकर यांच्या अधिकृत सामाजिक माध्यम खात्यावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवेदनानुसार, अभिनेत्रीबाबत ऑनलाइन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विविध प्रकारचा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या मजकुरामध्ये असत्य माहिती, अफवा, बदनामीकारक आरोप तसेच त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित बाबींचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीची बदनामी करणे, खोटी माहिती पसरवणे किंवा गोपनीयतेचा भंग करणे स्वीकारार्ह नाही. त्यामुळे अशा प्रकारचा मजकूर तयार करणे, प्रसारित करणे किंवा तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करणे याकडे गांभीर्याने पाहिले जाणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी शरद पवार गटाचे सर्व 8 खासदार दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण
विशेष म्हणजे, 10ऑगस्ट 2026 पासून अशा प्रकारच्या प्रकरणांवर कायदेशीर पातळीवर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती, सामाजिक माध्यम खातेधारक, संकेतस्थळे किंवा संस्थांविरोधात कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अमृता खानविलकर यांच्या कायदेशीर टीमने चाहत्यांसह सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही अप्रमाणित माहिती, अफवा किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित संवेदनशील मजकूर प्रसारित करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
या निवेदनामुळे मनोरंजन विश्वात आणि सोशल मीडिया वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, अभिनेत्रीच्या या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. वैयक्तिक गोपनीयता आणि सोशल मीडियावरील जबाबदारी याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.