Shanishinganapur : सध्या जिल्ह्यासह राज्यात शनिशिंगणापूर येथील शैनेश्वर देवस्थानामधील बनावट ॲप तसेच कोट्यवधींचा घोटाळा हे प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. नुकतेच या देवस्थानाच्या सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे (Nitin Shete) यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाला आता नवीन वळण प्राप्त झाले आहे. पोलिसांनी देवस्थानच्या विश्वस्थांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. शेटे यांची आत्महत्या व त्यानंतर आता या प्रकरणात अनेकांच्या मनात कारवाईचा धसका वाढला आहे. विश्वस्त मंडळाचा संशयास्पद कारभार व ऑनलाईन अॅप घोटाळ्याची चौकशी सुरु असताना आता शेटे कुटुंबियांकडून आत्महत्येचे नेमके गूढ उकलावे, याकरीता निःपक्ष चौकशीची मागणी होऊ लागली आहे. यामुळे या प्रकरणी आता पुढे काय होणार हे पाहणे देखील महत्वाचे आहे.
देवस्थान व्यवस्थापनामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक आर्थिक अनियमितता व निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकता सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. देवस्थान ट्रस्टमध्ये भरण्यात आलेले बोगस कर्मचारी भरती व यामधून झालेला मोठा आर्थिक गैरव्यवहार याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात थेट चौकशीचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणी नेवासा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी देखील या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.
दरम्यान देवस्थानामधील बनावट ॲप प्रकरण व यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा याप्रकरणी पोलीस प्रशासनाने देखील तातडीने पाऊले उचलत सायबर शाखेच्या वतीने शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच देवस्थानच्या विश्वस्तांवर फौजदारी दाखल करणार असल्याचे संकेत देखील मुख्यमंत्र्यांनी दिले व चौकशीचे सत्र सुरू झाले. चौकशीचा फेरा सुरू असताना सोमवारी सकाळी देवस्थानचे माजी विश्वस्त व सध्या उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत असलेले नितीन सुर्यभान शेटे यांनी राहत्या घराच्या समोरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रतिक्रया देताना म्हंटले कि, नितीन शेटे यांना या चौकशीसाठी कधीही पोलिसांनी बोलावले नव्हते किंवा त्यांना समन्सही बजावण्यात आले नव्हते. त्यांनी आत्महत्या केलेल्या स्थळी कोणतीही सुसाईड नोट नव्हती यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी अंतीच नेमकं त्यांनी हे पाऊल का उचललं हे समजेल असे घार्गे म्हणाले.
माजी आयुक्तांवर ईडीची कारवाई अन् खासदार राऊतांचे मंत्री भुसेंवर गंभीर आरोप
दरम्यान नितीन शेटे हे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक मानले जात होते. विश्वस्त मंडळाची चौकशी आदेश असताना शेटे यांची आत्महत्या व त्यांच्या मृत्यूमागे कोणी आहे का? तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणी आता खुद्द मयत नितीन शेटे यांचे पुतणे वैभव शेटे यांनी केली आहे. यामुळे याप्रकणात आता नवीन काय घडामोड समोर येते पाहणे महत्वाचे आहे.