Download App

Satyajit Tambe : घराणेशाहीचा आरोप चुकीचा, मी आंदोलनातून तयार झालोय, तांबेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency)अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील निफाड, विंचूर चांदवड आणि मालेगाव, धुळे (Dhule) असा त्यांचा दौरा असणार आहे. निफाड शहरातील चौकात कार्यकर्त्यांनी तांबे यांचं स्वागत केलं असून आज ते विविध संस्थांना भेटी देणार आहेत. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सत्यजित तांबे म्हणाले की, माझ्या वडिलांनी 15 वर्षात ऋणानुबंध या मतदारसंघात जमवले असून लोकांची मनं जिंकण्याचं काम डॉ. तांबे यांनी केलं आहे. थोरात-तांबे परिवाराचा या मतदारसंघात संपर्क आहे. आज पक्षीय राजकारणाच्या पलिकडं जाऊन अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचे यावेळी तांबे यांनी सांगितले. हाच ऋणानुबंध जपण्याची जबाबदारी आपल्यावर असून ती आपण पुढे घेऊन जाणार असल्याचा विश्वास सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलाय.

तांबे म्हणाले की, मुंबई, दिल्लीत बसलेल्या लोकांना ग्राऊंड परिस्थिती माहीत नसते. ग्राऊंडवरील लोकं प्रेमानं आमच्यासोबत जोडली आहेत. निवडणूक जिंकणं हा महत्वाचा मुद्दा नाही, मात्र निवडणुकीच्या निमित्तानं लोकांपर्यंत जाणं, संपर्क करणं आणि त्यांचे विविध प्रश्न समजून घेणं आणि त्यांचा ऋणानुबंध व्यक्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय. सर्व कॉंग्रेसचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्ते आपल्यासोबत असून या ठिकाणी एक पक्ष नाहीत, तर शिवसेना (Shivsena), भाजप (BJP), कॉंग्रेस(Congress)चे कार्यकर्ते आहेत.

सत्यजित तांबे आज नाशिक जिल्ह्यासह धुळे जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. निवडणुकीसाठी सात दिवस बाकी आहेत. प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय. ही निवडणूक तरुणांनी हाती घेतली आहे. युवकांच्या प्रश्नाबाबत किंवा उद्योगधंद्याबाबत विविध प्रश्न आहेत. या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एक हक्काचा प्रतिनिधी मिळणार आहे. आपण गेल्या 22 वर्षांपासून काम करत आहे. वयाच्या 17 व्या वर्षी राजकारणाला सुरुवात केली. देशातलं एकही राज्य नाही जिथं मी पोहोचलो नाही. राज्यातील एकही तालुका नाही, ज्या ठिकाणी आपण पक्ष संघटनेचं काम केलं नाही, माझ्यावर काल परवापर्यंत 50 केसेस आंदोलनाच्या होत्या. त्यामुळं मला पासपोर्ट मिळत नव्हता, मी आंदोलनातून तयार झालेलो आहे. त्यामुळं माझ्यावर घराणेशाहीचा होणारा आरोप चुकीचा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्व पक्ष जाती, विविध संघटना यांना एकत्र घेऊन पदवीधर मतदारसंघात काम करत आहे. हीच डॉ. तांबेंनी (Dr.Sudhir Tambe)या मतदारसंघात तयार केलेली ताकत आहे. आम्ही कधीही कोणाची फसवणूक करु शकत नाही. त्यामुळं आता तुम्ही सर्वांनी मदत करा, असं आवाहनही यावेळी सत्यजित तांबे यांनी केलंय.

Tags

follow us