अहिल्यानगरमध्ये महापौर पदासाठी भाजप की राष्ट्रवादी; कोणाचा होणार महापौर?

महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अहिल्यानगर महापालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर होणार, याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.

Untitle (9)

Untitle (9)

Ahilyanagar Mayor : नगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला १६ जानेवारीला. यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अभुतपूर्व यश मिळाले. या निवडणुकीनंतर युतीच्या कोणत्या पक्षाचा कोण महापौर होणार यावर चर्चा रंगू लागली. आज (ता. २२) मंत्रालयात राज्यातील २९ महापालिकांतील महापौर पदाची आरक्षण सोडत झाली. यात अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला नगरसेविकेला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आणि राजकीय चर्चांना भलतेच उधाण आले.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजपला २५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २७, शिवसेना शिंदे गटाचे १०, काँग्रेस व एआयएमआयएमचे प्रत्येकी दोन तर बसपचा एक नगरसेवक निवडून आला. काल (ता. २१) भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गट नोंदणी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. भाजपचे गटनेतेपदी शारदा ढवण तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची निवड करण्यात आली. 

अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीचं पाऊल, गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड

प्रशासकीय नियोजित कार्यक्रमानुसार आज (ता. २२) महापौर पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला नगरसेविकेला मिळणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली ती ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या महिला नगरसेविकेंची. यात १० नगरसेविकांची नावे समोर आली आहेत. यात भाजपकडे तीन तर राष्ट्रवादीकडे सात ओबीसी महिला नगरसेविका आहेत. 

‘दो दीवाने सहर में’ मधील प्रेममय गाणं ‘आसमा’ काही तासांत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

भाजपकडे गटनेत्या शारदा ढवण, पुष्पा बोरूडे, आशाबाई कातोरे यांची नावे समोर आली आहेत. तर राष्ट्रवादीकडून सुजाता पडोळे, वर्षा काकडे, अश्विनी लोंढे, आशा डागवाले, सुनीता फुलसौंदर, ज्योती गाडे, संध्या पवार यांची नावे समोर येत आहेत. ज्योती गाडे या भाजपच्या दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आहेत. तसेच त्या यापूर्वी नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. शारदा ढवण या भाजपच्या सध्या गट नेत्या आहेत. शिवाय त्या यापूर्वीही नगरसेविका होत्या. हीच बाब संध्या पवार, पुष्पा बोरुडे व सुनीता फुलसौंदर यांच्याबाबतही आहे. शारदा ढवण यांनी प्रभाग १ ब मध्ये निवडणूक लढवली होती. या जागेवर भाजप व राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत झाली. यात शारदा ढवण यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे त्या चर्चेतील चेहरा ठरल्या. त्यांच्याकडे भाजपकडून गटनेतेपद देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून त्या महापौरपदाचा चेहरा असल्याची चर्चा आहे. 

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ ने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं बळ!

दरम्यान, राज्यात भाजपचे जास्तीत जास्त महापौर बसविण्याच्या हलचाली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टीमने सुरू केल्या आहेत. त्यानुसार भाजपला अहिल्यानगरचे महापौरपद मिळू शकते अशी चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवाय ओबीसी महिला नगरसेविकांची संख्याही त्यांच्याकडे जास्त आहे. त्यानुसार राष्ट्रवादीला महापौरपद मिळू शकते, असाही कयास काहीजण लावत आहेत. नक्की महापालिकेत महापौर कोण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version