Ahilyanagar News : राज्य सरकारने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी ऑनलाइन (Ahilyanagar News) नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे. या कल्याणकारी मंडळामार्फत चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सेवा, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्य वृद्धी योजना अशा विविध लाभकारी योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी प्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. यासाठी https://ananddighekalyankarimandal.org या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. सभासद नोंदणी करताना वाहनमालकाचे नाव, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी माहिती भरून आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करावी.
अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह येत्या 48 तासात पाऊस…, यलो अलर्ट जारी
अर्जातील माहिती तपासून सर्व अटींची पुर्तता झाल्यास अर्ज मंजूर केला जातो. अर्जामध्ये त्रुटी असल्यास ‘कार्यालयाशी संपर्क साधा’ असा मेसेज प्राप्त होतो. अशा वेळी संबंधित परिवहन कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करून घ्यावी. नोंदणी व ओळखपत्रासाठी 500 रुपये आणि सभासद शुल्क 300 रुपये असे एकूण 800 रुपये शुल्क भरणे बंधनकारक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 27 जानेवारी 2025 रोजी या मंडळाची स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली. यासाठी राज्य सरकारने 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबवण्यात येईल.
राज्यातील सर्व रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना 500 रुपये नोंदणी शुल्क आणि 300 रुपये वार्षिक वर्गणी भरुन या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. 65 वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत 10 हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
राज्य सरकार चालवणार छावा राईड, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा