Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडणार आहेत. आता प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांकडून पक्ष बळकट करण्यासाठी व मोर्चेबांधणीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊ लागले आहे. याच अनुषंगाने राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आज आपल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने थोरात यांनी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यानंतर आमदार खासदार पदाधिकारी यांच्याकडून राजकीय भविष्य पाहता सत्ताधाऱ्यांकडे पावले वळविण्यात आली. पक्षांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवसंजीवनी निर्माण करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून आपापल्या नेत्यांमार्फत कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. यातच नगर जिल्ह्यामध्ये आघाडीतील अनेक पदाधिकारी यांनी सत्ताधाऱ्यांकडे आपले पावले वळवली.
दरम्यान येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने पक्ष मजबुतीसाठी आता खुद्द नेते मंडळीच मैदानात उतरले आहेत. याच अनुषंगाने काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी सर्व फ्रंटल अध्यक्ष तालुकाप्रमुख निरीक्षक व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली आहे.
Ahilyanagar : ठाकरे गटाचा कॉंग्रेसला धक्का, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी हाती घेतली मशाल
भविष्यातील वाटचालीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असून आपली साथ आपली ताकद काँग्रेसच्या विजयाचा पाया यासाठी प्रत्येकाने हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन देखील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केले आहे. या बैठकीच्या माध्यमातून थोरात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळातील निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत.
उपनेत्यांची बैठक, ठाकरे गटही सक्रिय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत आता आघाडीतील ठाकरे गटही सक्रिय झाला आहे. मध्यंतरी ठाकरे गटाला लागलेली गळती पाहता आता पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची वेळ असल्याचे पाहत ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या उपनेत्यांची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नगरमध्ये ठाकरे सेना अन् काँग्रेसला गळती; दिग्गजांनी पक्ष सोडल्याने वाताहत