Pahalgam Terror Attack : काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना परतण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही खा. नीलेश लंके यांनी दिली. खासदार लंके यांनी सर्व पर्यटकांची आस्थेने चौकशी करून आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे.
पर्यटनासाठी गेलेले देशाच्या विविध भागांतील पर्यटक भितीच्या छायेखाली आहेत. या हल्ल्यानंतर काश्मीर ते जम्मू हा रस्ता (Jammu Kashmir Attack) वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तो पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. पर्यटकांनी खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे जम्मू येथे यावे. जम्मूतून या पर्यटकांना रेल्वेची तिकीटे तातडीने मिळवून देण्यासाठी आपले कार्यालय सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही खा. लंके (Nilesh Lanke) यांनी दिली. या पर्यटकांच्या परतीच्या तिकीटासाठी आपले पत्रही रेल्वे प्रशासनास देण्यात येईल असेही खा. लंके यांनी प्रवाशांना सांगितले.
अहिल्यानगरमधील तृतीयपंथी काश्मीरमध्ये अडकले; व्हिडिओ पोस्ट करत सरकारला मदतीची विनंती
या प्रवाशांना विमानाने परतण्यासंदर्भातही खा. लंके यांनी संबंधितांशी चर्चा केली. मात्र अतिरेकी हल्ल्यात ठार झालेले पर्यटक व त्यांचे नातेवाईक यांना हवाई प्रवासात प्राधान्य देण्यात येत असल्याने हवाई मार्गाने परतण्यासाठी सध्या तरी अडचणी येत आहेत. त्यामुळे या पर्यटकांनी जम्मूवरून रेल्वेमार्गाने अहिल्यानगरकडे यावे असे खा. लंके यांनी सांगितले. दरम्यान, नगरपर्यंत पोहचेपर्यंत काही अडचणी आल्यास संपर्क साधावा असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांनी खा. लंके यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी खा. लंके यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आणखी कोणी पर्यटक काश्मीरमध्ये असतील तर त्यांनीही संपर्क करावा. त्यांना तातडीने मदत उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी दिले.
पाकिस्तानला टोचणारा शिमला करार नेमका काय? करार स्थगित करण्यामागे पाकिस्तानचा कुटील डाव..