Download App

अहिल्यानगरमध्ये भाजपाचं धक्कातंत्र, इच्छुकांना गुगली अन् नव्या चेहऱ्याला संधी; शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते..

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अनिल मोहिते यांची अहिल्यानगर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

Ahilyanagar News : भारतीय जनता पार्टीने आज राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये अहिल्यानगर शहराध्यक्षपदाचीही घोषणा केली आहे. शहराध्यक्ष पदाच्या निवडीत यंदा भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्याचे दिसते. नगर शहरात कुठलीही चर्चा नसलेला नवा चेहरा शहराध्यक्षपदी देण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अनिल मोहिते यांची अहिल्यानगर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष संघटना बांधणी करण्याच्या उद्देशाने भाजपने जिल्हाध्यक्षांची घोषणा केली होती. आज दुसऱ्या टप्प्यातील काही जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. यात सर्वात आश्चर्यकारक नाव अहिल्यानगरमधून समोर आलं. अहिल्यानगर भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची घोषणा करण्यात आली. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना आणि कोणतीही चर्चा नसताना अनिल मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा…, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार?

खरंतर शहरातील भाजपाचं नेतृत्व आपल्याच हाती राहावं यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. माजी शहराध्यक्ष महेंद्र गंधे, माजी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, सचिन पारखे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे अशी नावे चर्चेत होती. अभय आगरकर यांनी तगडी फिल्डिंगही लावली होती. तर दुसरीकडे शहरातील भाजपाची सूत्रे आपल्याच हातात राहावी यासाठी लोणीतून हालचाली सुरू होत्या. त्यातूनच माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचं नाव पुढे आलं होतं. परंतु, धनंजय जाधव काँग्रेसमधून आलेले असल्याने त्यांचे नाव आपोआप मागे पडले.

या निवडीवेळीही राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष दिसून आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता नव्या चेहऱ्यांना संधी द्या असा सूर विखे गटाचा होता. तर दुसरीकडे राम शिंदे यांनी निष्ठावंत आणि मूळ भाजपचेच असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी असा आग्रह धरला होता. काही जणांचे म्हणणे होते की या पदावर ओबीसी चेहऱ्याला संधी द्यावी. या गोष्टींचा विचार करता काही नावे समोर आली होती. याचा विचार करता या नावांतूनच एखादा उमेदवार निवडला जाईल अशी शक्यता होती. मात्र या सगळ्यांची नावे बाजूला राहून शहराध्यक्षपदी अनिल मोहिते यांना संधी मिळाली.

कोण आहेत अनिल मोहिते ?

शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते नगरजवळील केडगाव येथील आहेत. याआधी त्यांनी भाजपा शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. केडगाव येथील रस्त्यांची दूर व्हावी यासाठी त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली होती. उपनगरातील रस्त्यांच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली होती.

भाजपाच्या संघटनात्मक निवडींमध्ये जिल्हाध्यक्षांची दुसरी यादी जाहीर; बीड, नगर, संभाजीनगरमध्ये कोण?

follow us