Sujay Vikhe on Nilesh Lanke : नगरला विळद घाटात नवीन एमआयडीसीची उभारणी करून युवकांना रोजगार देण्याची जबाबदारी सुजय विखेची आहे. ही जबाबदारी मी तुम्हाला पूर्ण करून दाखवणार. ह्याला काम म्हणतात. लग्नात बुंदी वाढणं हे खासदाराचं काम नाही, असा खोचक टोला माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार नीलेश लंकेंना लगावला. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे माजी खासदार सुजय विखे, आमदार शिवाजी कर्डिले, पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना सुजय विखेंनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली.
अहिल्यानगर शहरात विमानतळ होणार? मुरलीधर मोहळांनी स्पष्टच सांगितलं
विखे पुढे म्हणाले, लग्नात बुंदी वाढणं हे खासदाराचं काम नाही. केटरींगवाले नाहीत का? वाढपी नाहीत का? मग लोकप्रतिनिधीचं काम काय? एकदा तुम्ही तरी मला सांगा. यासाठी आता आपण नगर तालुक्यात मतदानच घेऊ. खासदाराकडून नेमकं काय अपेक्षित आहे. आम्ही बुंदी वाढली पाहिजे, कपडे धुतले पाहिजे, एसटी चालवली पाहिजे, पाणी आणलं पाहिजे की मुलांना रोजगार आणला पाहिजे असा सवाल करत विखे म्हणाले ही जबाबदारी तुमची आहे. माणसं ओळखायला शिका. मी दु्र्दैवाने अभिनय करू शकलो नाही. माझा तो स्वभाव नाही. मी कधी नाटक करतच नाही. पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील”, अशी ग्वाही सुजय विखे यांनी यावेळी दिली.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणीपुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले, “राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे. निश्चितच परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल व आमदार शिवाजीराव कर्डिले आणि काशिनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा लवकरच पूर्ण होईल.
गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेचा प्रश्न ही सोडविला जाईल व नागरिकांच्या मागणीला यश मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच जो आपल्या गावासाठी पाणी देईल, त्यालाच पाठिंबा द्या, असे आवाहन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनतेला केले. “जो संकटाच्या काळात आपल्या बाजूने नाही, त्याला संघटनेत स्थान नाही.” असे देखील मत मांडून कठीण प्रसंगी साथ सोडणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला.
‘त्या’ लॅम्बोर्गिनी गाडीच्या काचा खाली घेतल्या असत्या तर.. राधाकृष्ण विखेंचा रोहित पवारांवर पलटवार