स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी विधान परिषद निवडणूक (Election) जाहीर झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमधील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात राजकीय जुगलबंदी सुरू झाली आहे.
गुलाबराव पाटील हे त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी मुंबईत फिल्डिंग लावत असतानाच, गिरीश महाजन यांनी गुलाबराव मुंबईला जात असतील तर मी देखील तातडीने दिल्लीला जात आहे, असा खोचक टोला लगावला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर शिवसेनेचा हक्क सांगितला आहे. या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीची मागणी आम्ही पक्षाकडं केली आहे.
मोदी सरकार लवकरच कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा, कारणही सांगितलं
जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. मात्र, जागावाटपाचा अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. गुलाबराव पाटलांच्या या दाव्यावर गिरीश महाजन म्हणाले, गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जळगाव विधान परिषदेची जागा ही भाजपचीच आहे. आम्ही वर्षानुवर्षे ही जागा लढवत आलो आहोत आणि जिंकतही आलो आहोत. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत.
सध्या भाजपमधून निवडणूक लढवण्यासाठी तब्बल 10 जण इच्छुक आहेत, असा थेट दावा महाजन यांनी केला. गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना झाल्याच्या वृत्तावर गिरीश महाजन यांनी मिश्किल आणि खोचक चिमटा काढला. महाजन म्हणाले, गुलाबराव पाटील हे तातडीने मुंबईला रवाना होणार असून आपल्या मुलासाठी ते उमेदवारीची मागणी करणार असल्याची माहिती आहे. मात्र, मी देखील तातडीने दिल्लीला जात आहे. मी दिल्लीला धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे आहेत, म्हणून मी दिल्लीला जात नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
