नाशिक विधान परिषद निवडणूक जाहीर होताच महायुतीतच संघर्ष पेटला; भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत होण्याची शक्यता
दोन्ही पक्षांकडे जवळपास समान संख्याबळ असल्याने भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी थेट चुरस रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Conflict erupts within the Mahayuti : नाशिक विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी ही जागा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असून, ही निवडणूक महायुतीअंतर्गतच प्रतिनिष्ठतेचे लढत ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांकडे जवळपास समान संख्याबळ असल्याने भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी थेट चुरस रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांनी देखील मुंबईत पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
भाजपकडून गणेश गिते यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. याशिवाय बापू पिंगळे आणि सुरेश अण्णा पाटील यांची देखील नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे शिंदे सेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. 2028 मध्ये त्यांनी तत्कालीन एकसंध शिवसेनेकडून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे. त्यांच्या व्यतिरिक्त भाऊसाहेब चौधरी, अंजुम सुहास कांदे, अजय बोरस्ते आणि विजय करंजकर हे देखील इच्छुकांच्या शर्यतीत आहेत.
दरम्यान, अजित पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या नावाची चर्चा सुरू असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची नेमकी भूमिका काय, यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र संख्याबळाच्या कमतरतेमुळे बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे गटाकडून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसून, जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच निवडणूक लढवायची की नाही यावर निर्णय होणार असल्याचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
विज्ञान शिकवणारा शिक्षक की अंधश्रद्धेचा प्रचारक? नीट घोटाळ्यातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या व्हिडिओवरून संताप
2018 नंतर नाशिकचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्याने नव्या समीकरणांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आर्थिक सक्षमता हा देखील महत्त्वाचा मुद्दा मानला जात असल्याने, अखेर महायुती कोणत्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे फक्त महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीतील सदस्यांनाच मतदानाचा अधिकार असणार आहे. मनमाड नगरपालिकेतील दोन जागा रिक्त असल्याने प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या 581 इतकी असेल. मतदारसंख्येचा विचार केला तर नाशिक महापालिकेचे 122, मालेगाव महापालिकेचे 84 आणि विविध नगरपालिका-नगरपंचायतींतील ३७७ सदस्य मतदान करणार आहेत.
पक्षीय बलाबलात भाजपकडे 164, शिवसेना (शिंदे गट) 159 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 159 अशी ताकद आहे. उद्धव ठाकरे गटाकडे 47, इस्लाम पार्टीकडे 35, शरद पवार गटाकडे 16 तर इतर छोटे पक्ष आणि अपक्षांकडे 59 मते आहेत. एकूण चित्र पाहता महायुतीकडे तब्बल 482 मतांचे भक्कम संख्याबळ आहे. त्यामुळे विजयाची शक्यता महायुतीकडे झुकलेली असली तरी उमेदवारीसाठीची अंतर्गत स्पर्धाच या निवडणुकीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.