प्रशांत गोडसे, शिर्डी
BJP Convention in Shirdi : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाने माझ्यावर महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून माझा मोठा सन्मान केला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नूतन कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. भाजपाचे आज शिर्डीत दोन दिवसीय महाविजय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविंद्र चव्हाण यांच्या (Ravindra Chavan) नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नियुक्तीनंतर प्रथमच ते माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजप हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे हे या नियुक्तीतून पुन्हा सिद्ध झाले आहे. कार्यकर्ता म्हणून काम करताना कोणतीही अपेक्षा न करता एका विचारधारेबरोबर काम करीत असतात. जबाबदारीच ओझं खांद्यावर येतं तेव्हा दडपणही येतं. कार्यकारी अध्यक्ष ही तशी फार मोठी जबाबदारी आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखालील पुर्ण बहुमताचे महायुतीच चांगलं सरकार महाराष्ट्रात आहे. राज्यातील जनतेच्या अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बंडखोरांना पुन्हा भाजपात घेणार का? बावनकुळेंच्या उत्तराने ‘त्यांची’ घरवापसी बारगळणार..
सरकारबरोबर संघटना आणि संघटनेचा कार्यकर्ता असणे खूप गरजेचे असते. पंडित दीनदयाळ यांनी संदेश दिला होता की, शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारचं काम पोहोचविणे हेच खऱ्या अर्थाने संघटना आणि कार्यकर्त्यांचे काम असते. देवेंद्रजींनी सर्व विभागांना १०० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. त्याद्वारे ते अतिशय गतिमान पद्धतीने सरकारच्या योजना कार्यान्वित करतील. परंतु ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम संघटना आणि कार्यकर्त्यांचे असणार आहे. त्यामुळे ते एक मोठे आव्हान असणार आहे. राज्य संघटनेतील कार्यकर्त्यांच्या मदतीने ते काम नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही रविंद्र चव्हाण यांनी दिली.
साईबाबांच्या तिथक्षेत्री शिर्डीत आज माझ्या नावाची घोषणा झाली. नक्कीच साईबाबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी एकसंघपणे काम केले. राष्ट्रीय नेतृत्वाचे संपुर्ण लक्ष या निवडणुकीवर होते. त्यांच्या नेतृत्वामुळे हे सर्व यश मिळविणे शक्य झाले आहे. यश आणि यशाचे अनेक जण मानकरी असतात. आम्ही सर्वांनी मिळविलेले फार मोठे असे हे कार्यकर्त्यांचे यश आहे. संघटनेचे निर्णय खालपर्यंत घेऊन जाणे ही आपल्यावर जबाबदारी असून निवडणुकांची जबाबदारी देवेंद्रजी पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेते.
रविंद्र चव्हाण यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी; प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
येणाऱ्या काळात जनतेच्या सेवेबरोबरच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे खूप गरजेचे आहे. निवडणुका येतील आणि जातील यश, अपयश यांचा विचार न करता जनतेला सरकारचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण म्हणाले. दीड कोटी सदस्यांचे उद्दिष्ट गाठण्याचे संघटनेचे नियोजन आहे. येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी आणि त्यांच्या मर्जीने आवश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न करू असे रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले.