पारनेर बदनाम करण्याचा कट; शिर्डीतील गुन्हेगारीकडे दुर्लक्ष का? लंकेंचा विखेंना सवाल

Lankans question Vikhe विखेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार लंकेंनी ड्रग्ज ते नगर–मनमाड रस्त्यापर्यंत स्पष्ट भूमिका मांडली.

निवडणुकीत हरवलेलं आहेच, कोर्टातही तेच होईल…लंकेंचा विखेंवर पलटवार

Conspiracy to defame Parner; Why ignore crime in Shirdi Lankans question Vikhe : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुका आणि स्वतःची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक आरोपांची मालिका रचली जात असून, पारनेरशी कनेक्शन जोडण्याऐवजी शिर्डीत नेमके काय सुरू आहे, याची चौकशी व्हायला हवी, असा थेट आणि परखड सवाल खासदार नीलेश लंके यांनी नगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार लंके यांनी ड्रग्ज प्रकरणापासून ते नगर–मनमाड रस्त्याच्या कामापर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

ड्रग्ज प्रकरणात वस्तुस्थिती काय?

एलसीबीचा कर्मचारी शामसुंदर गुजर ड्रग्ज प्रकरणात अडकलेला असून, तो पूर्वी पारनेरमध्ये कार्यरत होता, याचा उल्लेख करत खासदार लंके म्हणाले, “ड्रग्ज कोणाच्या घरात ठेवले होते, त्याला एलसीबीमध्ये नियुक्त करण्यासाठी कोणी शिफारस केली, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पारनेर आणि माझ्यावर आरोप करण्याचा सोपा मार्ग निवडला जात आहे.”

शिर्डीतील गुन्हेगारीवर मौन का?

“शिर्डीत काय चालले आहे, याकडे लक्ष द्यायला हवे. बाबांनी सुरू केलेल्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली, असे केविलवाणे विधान कोणी केले होते, हे जनतेला माहीत आहे. तिथे सचिन गीधे या शेतकरी कुटुंबातील तरुणाला जाळून मारले गेले, त्याचा मृतदेहही मिळाला नाही. त्या प्रकरणातील आरोपी कोण, हे आधी स्पष्ट व्हायला हवे,” असा सवाल लंके यांनी उपस्थित केला.

घोटाळे आणि आरोपी कोणाच्या जवळचे?

ग्रोअर प्रकरणातील हजार–बाराशे कोटींच्या कथित घोटाळ्याचा उल्लेख करताना खासदार लंके म्हणाले, “तो घोटाळा करणारा साळवे कोणाचा कार्यकर्ता होता? त्या टीमला अटक होऊ नये म्हणून सवलत कोणी दिली? तपास एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडे का देण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे.”

नगर–मनमाड रस्त्यावर राजकारण नव्हे, काम बोलते

नगर–मनमाड रस्त्याच्या कामावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार लंके म्हणाले, “पाच वर्षे खासदार असताना हा रस्ता का झाला नाही? रस्ता खणून ठेवला गेला, मृत्यूचा सापळा बनला आणि शेकडो लोकांचे बळी गेले. मी खासदार झाल्यानंतर पहिल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले, नवा ठेकेदार नेमला आणि आज काम वेगाने सुरू आहे.”

राजकीय स्टंटबाजी नव्हे, आम्ही काम करतो

“राजकारणात काही लोक काम करतात, तर काही लोक स्टंट करतात. आम्ही खासदार नसतानाही काम केले आणि आजही करतो. पाहणी करून देखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर आमचा भर आहे,” असे सांगत लंके यांनी टीकाकारांवर निशाणा साधला.

सिस्पे घोटाळ्यावर खुलासा

सिस्पे घोटाळ्याच्या आरोपांबाबत बोलताना खासदार लंके म्हणाले, “इन्फिनिटी कंपनीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्हाला निमंत्रण होते म्हणून आम्ही गेलो. तिथे अण्णा हजारे, पोपटराव पवार, आमदार उपस्थित होते. उद्घाटनाला जाणे म्हणजे गुंतवणूक करणे नव्हे. कोणत्याही कार्यकर्त्याचा किंवा माझा या घोटाळ्याशी संबंध नाही.”

‘कुत्रे भुंकतात, हत्ती चालत राहतो’

“कोणाला तरी पुढे करून प्रेस घ्यायला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे सगळे प्रयत्न अपयशी ठरत आहेत. कुत्ते भुंकते है, हत्ती चलता है,” अशा शब्दांत खासदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका ठामपणे मांडली.

follow us