बुलढाण्यातील पुतळ्याचा वाद चिघळला; सरपंच गणेश काकडसह 23 जण पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना अटक केली असून 38 हुन अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
23 people including Sarpanch Ganesh Kakad in police custody : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून सुरू झालेला वाद आता चिघळला असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. विनापरवानगी पुतळा उभा करणे, त्यावर प्रशासनाची कारवाई आणि त्यानंतर झालेली हाणामारी यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कलम 163 म्हणजेच संचारबंदी लागू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना अटक केली असून 38 हुन अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
चिखला काकड गावात 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्री अंगणवाडी परिसरात अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला. मात्र या स्थापनेसाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी घेण्यात आलेली नव्हती, असा अहवाल तहसीलदार कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालयाने पुतळा हटवण्याचे आदेश दिले. दरम्यान 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री काही शिवप्रेमींनी पुन्हा एकदा अश्वारूढ पुतळा तिथे बसवला. प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता ही स्थापना करण्यात आल्याने गावात दोन्ही गट आमनेसामने आले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.
महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला
या संघर्षादरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हाध्यक्ष संजीवनी वाघ यांच्यावर कथित हल्ला झाल्याची घटना समोर आली. पुतळा हटवण्याच्या प्रक्रियेला विरोध करत असताना काही समाजकंटकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेत असतील वर्तन झाल्याचा देखील दावा केला जात आहे. या घटनेचा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाची कडक पावले
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. गावाचे सरपंच गणेश काकड यांना वाशीम जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं असून आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ
राजकीय पडसाद
या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटले असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील काही नेत्यांकडून विशिष्ट समाजाबद्दल द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाला 24 फेब्रुवारीपर्यंत दोषींवर कठोर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
समाजाची भूमिका
दरम्यान पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ आणि वस्तुस्थिती मांडण्यासाठी वंजारी समाजातर्फे गावात सत्य कथन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. केवळ दोषींवरच कारवाई व्हावी आणि निष्पाप नागरिकांना त्रास होऊ नये, अशी मागणी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास अधिकृत परवानगी दिली जाणार का, आणि गावातील तणाव कधी निवळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
