अचानक झाला चमत्कार! रुग्णवाहिका खड्ड्यात आदळली आणि ‘ब्रेन डेड’ महिला जिवंत झाली

ब्रेन डेड असल्याचे घोषित केले आणि जिच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील घरात सुरू झाली होती, ती महिला मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः परत आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 3

Ambulance crashes into ditch and ‘brain dead’ woman comes back to life : उत्तर प्रदेशातील पिलिभीत जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. ज्या महिलेला डॉक्टरांनी ब्रेन डेड असल्याचे घोषित केले होते आणि जिच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील घरात सुरू झाली होती, ती महिला मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः परत आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून अनेकजण याला चमत्कार म्हणत आहेत.

ही घटना पिलिभीत शहरातील गोकुलपुरम कॉलनीमध्ये घडली. येथे राहणाऱ्या विनिता शुक्ल या 22 फेब्रुवारी रोजी अचानक घरात बेशुद्ध पडल्या. त्या अचानक खाली कोसळल्याने कुटुंबीयांमध्ये मोठी घबराट उडाली. घरच्यांनी तातडीने त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी बरेली येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

कुटुंबीयांनी कोणतीही वेळ न दवडता विनिता यांना तातडीने बरेलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सलग दोन दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र या काळात त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसून आली नाही. डॉक्तरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मेंदूची प्रतिक्रिया जवळजवळ थांबली होती आणि त्यांच्या अवस्था ब्रेन डेड सारखी झाली.

डॉक्तरांनी कुटुंबीयांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, व्हेंटिलेटरवर काढल्यानंतर त्यांच्या जगण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ही बातमी ऐकल्यानंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी विनीता यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना पीलीभीतला परत आणण्याची व्यवस्था करण्यात आली.

24 फेब्रुवारी रोजी जेव्हा रुग्णवाहिका विनीता यांना घेऊन घरी पोहोचत होती, तेव्हा त्यांच्या घरात आधीच शोककळा पसरली होती. कुटुंबीय आणि नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे घरात अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली होती. लाकडांची व्यवस्था करण्यात आली होती, नातेवाईक आणि शेजारी अंत्यदर्शनासाठी घराबाहेर जमा झाले होते.

पुढील 3 वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यूएई आणि सिंगापूरलाही मागे टाकेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

मात्र याच वेळी नियतीने एक अनपेक्षित वळण घेतले. रुग्णवाहिका गोकुलपुरम कॉलनीकडे येत असताना रस्त्यातील एका मोठ्या खड्ड्यामुळे वाहनाला जोराचा धक्का बसला. त्या धक्क्यामुळे विनीता यांच्या शरीरालाही झटका बसला. त्याच वेळी रुग्णवाहिकेत उपस्थित असलेल्या कुटुंबीयांच्या लक्षात आले की त्यांच्या शरीरात हालचाल होत आहे. सुरुवातीला त्यांना वाटले की कदाचित हा केवळ भास असेल.

मात्र काही क्षणांतच विनीता यांनी हलकी हालचाल केली आणि त्यांच्या श्वासोच्छ्वासात बदल दिसून आला. हे पाहून कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. मृत समजल्या गेलेल्या व्यक्तीला शुद्ध येत असल्याचे पाहून सर्वजण स्तब्ध झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन कुटुंबीयांनी त्यांना घरी नेण्याऐवजी तातडीने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विनीता यांना लगेचच पीलीभीत येथील डॉक्टर राकेश न्यूरो सिटी हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

या रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांची सखोल तपासणी केली आणि तातडीने उपचार सुरू केले. पुढील 14 दिवस त्यांच्यावर सातत्याने उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे विनीता यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. काही दिवसांनंतर त्यांनी व्यवस्थित डोळे उघडले, प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यांची प्रकृती स्थिर होत गेली. अखेर डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे धोका टळल्याचे सांगितले आणि त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

सध्या विनीता शुक्ला पूर्णपणे बऱ्या झाल्या असून त्या आपल्या कुटुंबासोबत घरी आहेत. ज्या घरात काही दिवसांपूर्वी अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, त्याच घरात आता आनंदाचे वातावरण आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. अनेकजण याला चमत्कार मानत आहेत, तर काही जण वैद्यकीय दृष्टिकोनातूनही या घटनेबाबत चर्चा करत आहेत. मात्र विनीता यांच्या कुटुंबासाठी हा प्रसंग आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला आहे. कारण मृत्यूच्या दारातून परत आलेली व्यक्ती पुन्हा त्यांच्या आयुष्यात परतली आहे.

follow us