Ram Shinde replies Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीवरून सध्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. माझे विरोधक हे कुठल्यातरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात. मात्र त्यांना हेच माहीत नाही की सर्व्हे कसा केला जातो? अशा शब्दात पवारांनी शिंदेंना डिवचले होते. त्यावर आता भाजप आमदार राम शिंदे यांनीही जोरदार पलटवार केला आहे. मी कुठेही फोटो काढायला गेलेलो नाही. मी तरी याप्रश्नी नागरिकांच्या मीटिंग घेतल्या. माझं तुम्हाला (रोहित पवार) ओपन चॅलेंज आहे तुम्ही जागा निवडताना एखादी तरी बैठक घेतली होती का? तुम्ही निवडलेली जागा नेमकी कुणाची होती? अशा शब्दांत राम शिंदे यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. (BJP MLA Ram Shinde replies NCP MLA Rohit Pawar over Karjat MIDC Project)
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसी पाटेगाव-खंडाळा येथे व्हावी यासाठी आमदार रोहित पवार हे चांगलेच आग्रही होते. मात्र संबंधित जमीन फरार नीरव मोदी याची असल्याने या वादग्रस्त जमिनीवर एमआयडीसी होणार नाही व तो प्रस्ताव रद्द करण्यात आला व जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान पवारांना हा फटका बसल्यानंतर राम शिंदे यांनी एमआयडीसीसाठी तातडीने हालचाली सुरू केल्या.
Ram Shinde : आमच्या घरात काय चाललंय ते पाहण्यापेक्षा स्वतःच पाहा;राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला
काही दिवसांपूर्वी राम शिंदे यांनी नागरिकांची व प्रशासनाची बैठक घेत MIDC साठी जागा सुचवणेबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार काही जागा देखील पाहण्यात आल्या अशी माहिती शिंदे यांनी दिली. यावर रोहित पवार यांनी शिंदेंवर निशाणा साधला होता. माझे विरोधक हे कुठल्यातरी एखाद्या जमिनीवर जातात. अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात. मात्र त्यांना हेच माहीत नाही की सर्व्हे कसा केला जातो? शिंदेसोबत जे अधिकारी फिरत आहेत त्यांना एमआयडीसीकडून अधिकृत कोणतही पत्र मिळालं नाही. केवळ फोटो काढून लोकांना असं भासवायचं की मी खूप कष्ट करत आहे. मात्र लोकं एवढी भोळी नाहीत. लोकांना सर्व कळतं. कोण काम करतं व कोण नाटक करत आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी शिंदेंवर निशाणा साधला होता.
यावर प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, सर्व नियम अटींची पूर्तता केलेली जमीन सुचवा असे मी म्हणालो होतो. माझे रोहित पवार यांना आव्हान आहे. मी तरी नागरिकांच्या मीटिंगा घेतोय. पण माझा रोहित पवारांना सवाल आहे की त्यांनी जागा निवडताना एखादी तरी बैठक घेतली होती का? त्यांनी निवडलेली जागा नेमकी कुणाची होती? नीरव मोदीच्या जागेसाठी काही बोलणं झालं होतं का ? पाटेगाव ग्रामपंचायतीने विरोध का केला? फॉरेस्टमधील जागा का सुचवली? अशा प्रश्नांचे उत्तर रोहित पवार यांनी द्यावे असेही शिंदे म्हणाले.