BJP Convention in Shirdi : विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते शिर्डीत जमणार आहेत. उद्यापासून शिर्डी शहरात भाजपाचे दोन दिवसांचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे मंत्री उपस्थित राहणार आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यातील भाजपाचे सर्व मंत्री, केंद्रातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष असे १५ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 12 जानेवारी (रविवार) रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत आहे. नुकत्याच मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनिती या अधिवेशनात ठरविली जाणार असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात अनेक राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सामान्य भाविकाला मिळणार साईबाबांची आरती करण्याचा मान
अधिवेशनासाठी साई संस्थानच्या प्रसादालया शेजारील शताब्दी मैदानावर तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. ११ तारखेला भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होऊन १२ तारखेला सकाळी नड्डा अधिवेशाचे उद्घाटन करतील. दुपारी शाह भाजपच्या मंत्री, खासदार, आमदारांसह आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच पुढील वाटचालीच्या रणनीतीवर अधिवेशनात शिक्कामोर्तब होईल. अमित शाह शिर्डीनंतर शनिशिंगणापूरलाही जाणार आहेत.
अधिवेशनासाठी आठ एकर जागेवर भव्य मंडप उभारण्यात आला. त्यात पदाधिकाऱ्यांसाठी १५ हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. त्यात १ हजार व्हीआयपी खुर्च्यांचा समावेश आहे. ८० बाय ४० आकाराच्या मंचावर शाह, नड्डांशिवाय केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आसन व्यवस्था आहे. १५ एकर जागा पार्किंगसाठी ठेवली आहे.
VIDEO : शिर्डीत साईभक्ताकडून 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईचरणी अर्पण
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन मंत्री झाले आहेत. आता त्यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण असेल याची चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत मोठी प्रक्रिया असून या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तर दुसरीकडे या पदासाठी माजी मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. आणखीही काही नावांची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत शिर्डीच्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष पदासाठी नावाची घोषणा होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.