अहमदनगरः लष्कराच्या सरावाच्या के. के. रेंजसाठी (k. k. Range) अधिकची जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे जमिन जाणाऱ्या राहुरी, नगर, पारनेर या तीन तालुक्यांतील शेतकरी धास्तावले आहे. जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहेत. तर या निर्णयाला राजकीय विरोध सुरू झाला आहे. प्रवरानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence minister Rajnath Singh) यांनी खासदार सुजय विखे (Mp Sujay Vikhe) यांनी एक निवेदन दिले आहे.
त्यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, देशाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी यांच्या कल्याणासाठी मागील नऊ वर्षांपासून अविरत कार्यरत आहे. केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय हे देखील शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांचा हिताचे तसेच त्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेऊ.
प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते.राजनाथ सिंह म्हणाले की, देशात मागील नऊ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गरीब कल्याणासाठी अविरत काम करत आहे. शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रस्थानी ठेवून कल्याणकारी योजना तयार करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही के.के. रेंज जमीन संपादनाबाबत त्यांच्यावर कुठलीही जबरदस्ती करण्यात येणार नाही. भू संपादनाबाबत त्यांच्याशी चर्चा करूनच तसेच त्यांच्या हितचाच निर्णय सरकार घेईल. अहमदनगर येथील भूईकोट किल्ला, भिंगार कँटोन्मेंट बाबतची मागणी करण्यात आली आहे. त्यावर देखील सकारात्मक निर्णय घेवू, असे त्यांनी सांगितले.