विजयस्तंभ कार्यक्रमासाठी पुणे-अहिल्यानगर मार्गावरील वाहतुकीत बदल; चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गांवर निर्बंध
Bhima Koregaon: चाकण, शिक्रापूर व शिरूर मार्गे चाकण-अहिल्यानगर मार्गावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय.
पुणे: भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथील विजयस्तंभ परिसरात होणाऱ्या विजयस्तंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून 31 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत शहर व ग्रामीण भागातील प्रमुख महामार्गांवर व्यापक वाहतूक पुढीलप्रमाणे बदल लागू करण्यात आले आहेत. (Traffic changed on Pune-Ahilyanagar route for Bhima Koregaon Vijaystambh program; Chakan, Shikrapur, Wagholi Marganwar restricted)
जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद
चाकण, शिक्रापूर व शिरूर मार्गे चाकण-अहिल्यानगर मार्गावर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहेत. चाकण–शिक्रापूर–शिरूर मार्ग हा मार्ग फक्त अत्यावश्यक सेवांसाठी खुला राहणार असून इतर वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. वाघोली चौक, पेरणे फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक या ठिकाणांहून भीमा कोरेगावकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक तळेगावमार्गे
मुंबई–पुणे महामार्गावरून अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक ही तळेगाव–नाशिक फाटा–शिक्रापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.
नगरकडून पुण्याकडे येणारी वाहने शिक्रापूर–चाकण–तळेगाव मार्गे वळविण्यात येणार आहे.
अहिल्यानगरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक
बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही बेलवंडी फाटा, देवदैठण, धावलगाव, पिंपरी कोळंडर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर, पुणे महामार्गे पुण्याकडे जाईल.
अहिल्यानगरकडून सरळ पुण्याकडे जाणारी वाहतूक ही कायनेटिक चौक, केडगाव बाह्यवळण, अरणगाव बाह्यवळण, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर-पुणे रस्त्याने पुण्याकडे जाईल.
अहिल्यानगरकडून पुणे मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाण्याकडे जाणारी वाहतूक ही अहिल्यानगर- कल्याण रस्ता बाह्यवळण, आळेफाटा, ओतूर, माळशेज, घाट मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाण्याकडे जाईल.
हलकी व खासगी वाहने
हलकी व खासगी वाहने सकाळी ठराविक वेळेतच भीमा कोरेगाव परिसरात प्रवेश करू शकतील. विजयस्तंभ परिसरात वाहनतळ मर्यादित ठेवण्यात आले असून, वाहने नियोजित पार्किंगमध्येच उभी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन सेवांना सूट
रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस वाहने व अत्यावश्यक सेवा या वाहतूक बदलांतून वगळण्यात आल्या आहे. त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिक, भाविक व वाहनचालकांना निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे, नियमांचे पालन करण्याचे तसेच अनावश्यक वाहने घेऊन भीमा कोरेगाव परिसरात येऊ नये, असे आवाहन केले आहे. वाहतूक बदलांबाबत माहिती फलक, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व मार्गदर्शन पथके तैनात करण्यात आली आहेत.
