Download App

माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन; आदिवासी नेतृत्व हरपले !

ते 84 वर्षांचे होते. पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे ते मध्यंतरी रुग्णालयात होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

  • Written By: Last Updated:

Former minister and senior leader Madhukar Pichad passed away: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले (Akole) येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आदिवासी विकासमंत्री मंत्री मधुकर पिचड ( Madhukar Pichad) यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने ते रुग्णालयात होते. नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचे शुक्रवारी निधन झाले.

मधुकर पिचड हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. परंतु 2019 मध्ये त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत मुलगा वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. ते सक्रीय राजकारणात नव्हते. परंतु त्यांचा मुलगा माजी आमदार वैभव पिचड हे राजकारणात आहे.

Cabinet expansion : केसरकर, सावंत अन् सत्तारांना मिळणार डच्चू, DCM शिंदे नव्या चेहऱ्यांना देणार संधी…


सातवेळा आमदार

मधुकर पिचड हे 1980 ते 2004 या काळात अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ते सलग सात वेळा आमदार होते. 1995 ते 1999 या काळात ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. आघाडी सरकारमध्ये आदिवासी मंत्री होते. नगरचे पालकमंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे. मधुकर पिचड यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीतून राजकारणाला सुरुवात केली. 1972 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. ते अकोले पंचायत समितीचे सभापती होते. 1980 मध्ये ते काँग्रेसकडून पहिल्यांदा आमदार झाले. 1985, 1990 ला ते विधानसभेला निवडून आले. 1991 मध्ये ते आदिवासी विकासमंत्री झाले. तर पशुपालन, मत्सपालन खातेही त्यांच्याकडे होते. 1995 ला ते चौथ्यांदा आमदार झाले. त्यानंतर पुन्हा आदिवासी विकास खाते त्यांच्याकडे आले.

संजय राऊतांपासून ठाकरे गटाला धोका, त्यांना आवरा, अन्यथा…; शंभूराज देसाईंचं सूचक विधान


शरद पवारांबरोबर काँग्रेस सोडली

शरद पवार यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाला मधुकर पिचड यांनी सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी पिचड हे पवारांबरोबर होते. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 ला ते राष्ट्रवादीकडून ते आमदार झाले.2009 ला आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे आदिवासी विकास हे खाते होते. त्याच कालावधीत ते नगरचे पालकमंत्रीही होते. 2014 मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यांचा मुलगा वैभव पिचड हे 2014 हे राष्ट्रवादीकडून आमदार झाले. 2019 ला पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी सोडून ते भाजपकडे गेले. परंतु विधानसभेला वैभव पिचड हे पराभूत झाले. त्यानंतर पिचड यांच्या राजकारणाला एकामागून एक धक्के बसले.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं
– उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या पिचड यांनी पक्षासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल पिचड कुटुंबियांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.

follow us