Muttiah Muralitharan : जादुई गोलंदाज नावाने परिचित असलेले श्रीलंकेचे माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) यांनी आजवर क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रमांची नोंद केली आहे. आता एका वेगळ्या क्षेत्रात ते आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर मुरलीधरन यांनी उद्योग व्यवसायाकडे आपले पाऊल टाकले आहे. पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीत कोट्यावधींची गुंतवणूक मुरलीधरन करणार आहे.
देशात सर्वाधिक झपाट्याने विकसित होत असलेल्या सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीची श्रीलंकन माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन प्रकल्प उभारणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. या प्रकल्पासाठी १ हजार ६३५ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या कंपनीमध्ये विविध शीतपेयांसाठी लागणाऱ्या कॅनची निर्मिती होणार आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेट टीममधून निवृत्ती घेतल्यानंतर मुरलीधरनने सिलोन बेव्हरेजेस या उद्योग समुहाची निर्मिती केली. विविध ठिकाणी असलेल्या प्रकल्पांबरोबरच मुथय्या याने त्याच्या उद्योगाचा विस्तार वाढवत आला थेट सुप्याच्या एमआयडीसीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. या उद्योगासाठी ३५ एकर जमिनीची मागणी करण्यात आली असून त्यातून ४५५ तरूणांना रोजगाराची मिळणार आहे.
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार?, गैरव्यवहार झाल्याचं उघड; सरकार मोठा निर्यण घेणार
औद्योगिक विकास महामंडळाकडे मुथय्या मुरलीधरन याच्या कंपनीकडून जागेचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर मायनर मॉडीफीकेशन कमिटीच्या बैठकीत भूखंड वितरणाबाबत चर्चा करण्यात आली. या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्रालय पुढील प्रक्रिया पार पाडून येत्या एप्रिल महिन्यापासून या उद्योगाच्या बांधकामाला परवानगी देणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी डी.आर. काकडे यांनी सांगितले.
शीतपेये, उर्जापेये, तसेच खनिज पाण्याचे कॅन तयार करणे व ते त्यात भरून देणे हे काम या कंपनीकडून करण्यात येणार आहे. लवकरच या उद्योग समूहास भुखंड प्रदान करण्यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाकडून पहिल्या टप्प्याची रक्कम भरण्यासंदर्भात अधिकृत पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सुरूवातीस २५ टक्के रक्कम मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७५ टक्के रक्कम घेण्यात येईल. त्यानंतर सिलोन बेव्हरेजेस कंपनीस भूखंड हस्तांतरीत करण्यात येणार आहे. १ लाख ४० हजार स्क्वेअर मीटर जागा या प्रकल्पासाठी लागणार आहे.
मुथय्या मुरलीधरनच्या या प्रकल्पाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर भुखंडासंदर्भात समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रकल्पास भूखंड देण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली असून बैठकीचे इतिवृत्त उद्योग मंत्रालयास सादर करण्यात आले आहे. आता औद्योगिक विकास महामंडळाकडून मुथय्याच्या उद्योग समुहास ऑफर लेटर देण्यात येईल. त्यानंतर साधारणतः एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होईल अशी माहिती एमआयडीसीचे उपप्रादेशिक अधिकारी डी.आर.काकडे यांनी दिली.
सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीच्या म्हसणे फाटा विस्तारीत वसाहतीमध्ये सन २०१८ मध्ये कॅरिअर मायडिया ही मोठी कंपनी सुरू झाली. त्यानंतरच्या आठ वर्षांत या विस्तारीत वसाहतीमध्ये ३३ उद्योग सुरू झाले. सरत्या वर्षाअखेर या वसाहतीमध्ये ५ हजार १८६ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यातून १० हजार ५८४ तरूणांना रोजगार मिळाला. सिलोन बेव्हरेजेसच्या माध्यमातून तब्बल १ हजार ६३५ कोटी रूपयांची गुंतवणूक असणारा सर्वाधिक मोठा प्रकल्प या वसाहतीमध्ये उभारला जाणार आहे. कॅरिअर मायडिया या कंपनीने या वसाहतीमध्ये ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.
गड्या , आपला BMI कंट्रोल केलेलाच बरा; जास्त वाढला तर ‘या’ आजारांचा धोका
सन २०२० मध्ये सिलोन बेव्हरेजेस या मुथय्या मुरलीधरनच्या कंपनीची स्थापना झाली. एका कंपनीचे पेय व ते भरून देण्याचे काम या कंपनीमार्फत सरू करण्यात आले. आज श्रीलंका तसेच जगभरातील शीतपेय कंपन्यांना कॅनचा पुरवठा ही कंपनी करते. या कंपनीच्या मिनरल वॉटर, एनर्जी ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, हॉट फिल ज्यूस तसेच कॅनमधील फ्लेवर्ड दुधाची निर्मिती करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा त्यात समावेश आहे. सिलोन बेव्हरेजेसच्या प्रकल्पाची दरवर्षी ३०० दशलक्ष पेय कॅन तयार करण्याची तसेच ते भरून देण्याची क्षमता आहे.