Godakath festival organized by Mahatma Gandhi Charitable Trust and Priyadarshini Indira Mahila Mandal Kopergaon अहिल्यानगर: प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव (Kopergaon) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ (Godakath festival) महोत्सवाला कोपरगावकरांचा पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी देखील खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे गोदाकाठ महोत्सवात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावेळी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी बचत गटाच्या स्टॉलधारकांशी व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. दोनच दिवसात मोठ्या प्रमाणात मालाची विक्री झाली असल्याचे स्टॉलधारकांनी आ.आशुतोष काळे यांना सांगितले.
गोदाकाठ महोत्सवातून महिलांना हक्काची आर्थिक सावली; आमदार आशुतोष काळे
बचत गटाच्या महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या संकल्पनेतून माजी आमदार अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदाकाठ महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. ज्याप्रमाणे पहिल्याच दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली तेवढीच गर्दी दुसऱ्या दिवशी देखील पहायला मिळाली. बचत गटाच्या महिलांना अतिशय अल्प दरात ‘ना नफा-ना तोटा’ धर्तीवर स्टॅाल्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. जवळपास तीनशेपेक्षा जास्त स्टॅाल्सवर बचत गटाच्या महिलांनी आपली घरगुती उत्पादने विक्रीसासाठी आणली आहे. खात्रीशीर व स्वस्त दरात मिळत असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.
गोदाकाठ महोत्सवाची महती केवळ जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गोदाकाठ महोत्सव पोहोचल्यामुळे राज्याच्या विविध भागातून अनेक प्रकारच्या गृहउपयोगी वस्तू व खाद्य पदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांना उपलब्ध आहे. तसेच शेतकर्यांना शेतीसाठी आवश्यक लागणाऱ्या विविध वस्तू गोदाकाठ महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाची नागरिकांना वाजवी दरात खरेदी करण्याची संधी गोदाकाठ महोत्सवाच्या रुपाने मिळाली आहे.
गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध झाले असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील महिला बचतगटांचा व नागरिकांचा गोदाकाठ महोत्सवाला उस्त्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गोदाकाठ महोत्सवात बचतगटांच्या वस्तू विक्रीसह शालेय विद्यार्थ्यांच्या नेतृत्व कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिक याठिकाणी खरेदी करतात व सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आस्वाद घेतात. खरेदीसाठी प्रत्येक स्टॉल्सवर होत असलेली गर्दी पाहता पुढील दोन दिवसांत गर्दीचा उंच्चांक होणार असल्याचे दिसून येत आहे.