अहमदनगर: लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता तथा माध्यमांनी नैतिकता जपणे गरजचे आहे. पत्रकारितेच्या हातामध्ये लोकशाही जपण्याची मौलिक जबाबदारी आहे. ग्रासरूट जर्नालिझम हे समृद्ध व प्रगल्भ लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी ग्रासरूट जर्नालिझमची सध्याच्या परिस्थितीत महत्वपूर्ण भूमिका आहे. माध्यम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव झाला आहे. काळाच्या ओघात इंटरनेटचे वापरकर्ते झपाट्याने वाढत आहेत. या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया आला आहे. आता याचाच खुबीने वापर करत दुर्लक्षित घटकातील व्यथा, वेदना, त्यांचे प्रश्न आणि कधीही समोर न येणारे विषय सर्वसामान्य नागरिकांना ग्रासरूट जर्नालिझमच्या माध्यमातून जगासमोर आणण्याची संधी आहे. हे करत असताना प्रामाणिकता आणि विश्वासार्हताही जपावी, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले आहे.
अहमदनगर येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेच्या वतीने ग्रासरूट जर्नालिझम : संधी व उपयोगिता याविषयावर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अभिजीत कांबळे, पुणे येथील वरिष्ठ पत्रकार पंकज इंगोले, न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या संज्ञापन विभागाचे डॉ. बापू चंदनशिवे, सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेस जिल्हास्तरावरील माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. गव्हाणे म्हणाले, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारिता बळकट होणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पत्रकारितेला व्यापकता यावी. सर्वसामान्य माणूस त्याचे प्रश्न जेव्हा स्वत: जगासमोर मांडेल तेव्हाच हे स्वरुप व्यापक होईल. आजपर्यंत जगातील बहुतांशी ब्रेकिंग न्यूज या सर्वसामान्यांच्या माध्यमातूनच समोर आलेल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करावयाचे तर याचे प्राथमिक प्रशिक्षण, निर्भिड आणि निपक्ष:पातीपणे काम करण्याची तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.
अभिजीत कांबळे यांनी संवाद साधतांना सांगितले कि, डिजिटल माध्यमातून ग्रासरुट जर्नालीझम करण्याची चांगली संधी आहे. याची सुरुवात करत असताना तंत्रज्ञानाचे बारकावे आत्मसात करावेत. दुर्लक्षित घटकातील एखाद्या ज्वलंत विषयाची धोरणात्मक मांडणी करावी. यातून सरकारी पातळीवर दखल घेऊन तो प्रश्न मार्गी लागला जाऊ शकतो. प्रत्येकाला स्वत:चे चॅनेल अथवा वृत्तपत्र सुरू करणे शक्य नाही मात्र, सोशल माध्यमातून आपण पत्रकारितेची सुरुवात करून सामाजात विश्वासार्हता निर्माण करून त्याला व्यापक स्वरुप देऊ शकतात. तुमच्या माध्यमाची लोकप्रियता वाढली तर यातून आर्थिक उत्पन्नही मिळते. जे जमिनीस्तरावरील, तळागाळातील विषय आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या जगण्यासंबंधीचे विषय मांडणे म्हणजे ग्रासरूट जर्नालिझमची होय, त्यामुळे पत्रकारांनी बातम्या करत असताना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे.
वेबसाईट, सोशल मीडिया, फेसबुक, यूट्यूब ह्या डिजिटल माध्यमातून ग्रासरूट जर्नालिझम प्रभावीपणे करता येते परंतु त्यासाठी पत्रकारितेचे मुलभूत प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. ग्रासरूट जर्नालिझमच्या अनुषंगाने देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील झालेल्या विविध प्रयोगाविषयी उदाहरण देत स्पष्ट केले. प्रत्येकाची बातमी लिखानाची पद्धत वेगळी असते. वाचक वर्ग वेगळा असतो. त्यामुळे कोणाची लिखाण करताना कॉपी करू नये, स्वतःची वेगळी शैली निर्माण करावी असे त्यांनी आवर्जून सांगितले.