मंत्री गिरीश महाजनांनी डाव फिरविला; पत्नी साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्षा
Jamner NagarPalika Election: सत्ताधारी शिवसेनेबरोबर काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसने माघार घेत महाजनांचा मार्ग मोकळा केलाय.
Jamner NagarPalika Election : भाजपचे मंत्री व संकटमोचन म्हटले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जामनेर नगरपालिकेत (Jamner NagarPalika Election) मोठा डाव खेळला आहे. अर्ज माघारीचे दिवशी तिन्ही विरोधी उमेदवारांना माघारी घ्यायला लावून पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. सत्ताधारी शिवसेनेबरोबर काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसने माघार घेत महाजनांचा मार्ग मोकळा केलाय.
तिघा उमेदवारांकडून अचानक माघार
जामनेरच्या नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होईल, असे वाटत होते. भाजपकडून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या रिंगणात होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) प्रतिभा झाल्टे, काँग्रेसकडून रुपाली ललमानी आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ही होता. या ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढत होईल, असे वाटत होते. परंतु गिरीश महाजन यांनी मोठी खेळी केली. त्यानंतर तिन्ही उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जामनेर नगरपालिकेत विरोधकांचा सुपडासाफ झाला आहे.
सहा नगरसेवकही बिनविरोध
गिरीश महाजन यांनी जामनेर नगरपालिकेमध्ये मोठ्या राजकीय खेळ्या खेळल्या आहेत. केवळ नगराध्यक्ष नाही तर सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले आहेत. साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीमुळे गिरीश महाजनांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आलाय.
अर्ज माघारीसाठी आणखी एक दिवस, नगरसेवक बिनविरोध होणार ?
जामनेर नगरपरिषदेसाठी 26 नगसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती. त्यात सहा नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. आता वीस जागांसाठी निवडणूक होणार आहे. परंतु अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशीही आणखी काही राजकीय खेळ्या होऊ शकतात.
