नाशिक जिल्हा पेटला, चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी नागरीक संतप्त, गेट तोडून कोर्ट परिसरात घुसले
यादरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची लोकांची मागणी असून, यासाठी मोर्चे काढले जात आहेत.
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात (Crime) आल्यानंतर मालेगावमध्ये नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आलं असताना नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात जमलेल्या लोकांनी पोलिसांना बाजूला करत गेट तोडून आत प्रवेश केला.
यादरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची लोकांची मागणी असून, मागील अनेक दिवसांपासून यासाठी मोर्चे काढले जात आहेत. चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधम विजय खैरनार विरोधात मालेगावकरांचा संताप आता उफाळून आला आहे. आज कडकडीत बंद आणि मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र, याच मोर्चातील काही संतप्त नागरिकांनी थेट मालेगाव कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
मालेगाव चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी, नाशिकमध्ये आज जनआक्रोश
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 17 नोव्हेंबरला ही दुर्दैवी घटना घडली. तीन वर्षांच्या एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. नातेवाईक आणि लोकांकडून नराधमावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तीन वर्षांची चिमुकली काही मुलांसोबत अंगणात खेळत असताना आरोपीने सर्वांना चॉकलेट दिलं. यावेळी त्याने पीडितचिमुकलीला चॉकलेट देण्याचे आमिष देऊन घरी नेले. मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्यानंतर गावातच काही अंतरावर असलेल्या एका टॉवरच्या बाजूला चिमुकलीचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं.
पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता अत्याचार करून खून केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत रात्रीतून फरार आरोपी विजय खैरनार याला अटक केली. मुलीच्या वडिलांशी झालेल्या वादातून विजयने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि खून प्रकरणात मालेगाव न्यायालय परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. याआधीही न्यायालय आवारात महिलांनी आपला आक्रोश व्यक्त केला होता तर तरुणांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. न्यायालय आवराच्या दोघेही बाजूंना चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
